सोनीलिववर लवकरच द वेकिंग ऑफ अ नेशन ही सीरिज भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर भेटीला आला आहे. या सीरिजची सर्वजण वाट पाहत आहेत. सत्य घटनावर आधारीत ही एक ऐतिहासिक सीरिज आहे. या सीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि एमी अवॉर्ड विजेता राम माधवानीने केले आहे. ही सीरिज सोनीलिववर ७ मार्चला रिलीज होणार आहे.
ही सीरिज जालियनवाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची एक परिभाषित आणि महत्त्वाची घटना आहे. ही सीरिज इतिहासाच्या या काळ्या अध्यायामागची कारणे आणि ही घटना का घडली याचा शोध घेते. ‘द वेकिंग ऑफ नेशन’ ही कांतीलाल साहनी यांची कथा आहे. ही भूमिका तारुक रैनाने साकारली आहे. तो वसाहतवाद आणि श्वेत ब्रिटीश वर्चस्वाशी निगडीत कट उघड करतो. ही मालिका हंटर कमिशनच्या तपासाच्या निमित्ताने इतिहास पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न आहे.
राम माधवानी म्हणाला की, “ही केवळ सीरिज नसून त्याच्या मदतीने मी भारताचा समृद्ध इतिहास पुढे आणणार आहे. मी त्या संघर्षाला समोर आणणार आहे, जो आपण केलाय आणि त्याला सामोरे गेलो आहोत. जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्या कटाच्या पार्श्वभूमीवर विणलेली ही कथा माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप महत्त्वाची आहे. मला अभिमान आहे की मी ही सीरिज वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. सोनीलिव सारख्या प्लॅटफॉर्मवर आणि तारुक रैना, निकिता दत्ता आणि भावशील सारख्या अप्रतिम कलाकारांसोबत काम करताना मी खूप उत्साहित आहे. अमिता माधवानी, मी आणि राम माधवानी फिल्म्समधील आमची टीम ही कथा प्रेक्षकांना किती भावते, हे पाहण्यासाठी उत्सुक आहोत. राम माधवानी आणि अमिता माधवानी निर्मित, या सीरिजमध्ये तारुक रैना, निकिता दत्ता, साहिल मेहता आणि भावशील सिंग साहनी यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे. या मालिकेचे लेखन शंतनू श्रीवास्तव, शत्रुजित नाथ आणि राम माधवानी यांनी केले आहे.