‘पंचायत’ ही लोकप्रिय वेबसीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून, या सिरीजच्या चौथ्या सीझनला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चौथा सीझनही अपुरा सोडल्याने ‘पंचायत’च्या पाचव्या सीझनची चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. नुकतंच या सीरिजमध्ये ‘मंजू देवी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘पंचायत सीझन ५’ ची स्क्रिप्ट आधीच लीक झाली आहे.
‘पंचायत ५’ लवकरच
एका कार्यक्रमात पत्रकारांनी पुढील सीझनबाबत विचारणा केली असता नीना गुप्ता हसत म्हणाल्या, "पंचायत ५ ची स्क्रिप्ट लीक झाली आहे, पुढच्या सीझनसाठी तयार राहा." त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘पंचायत’च्या पाचव्या भागाविषयी चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. ‘पंचायत’ सीझन ४ च्या शेवटी काही प्रश्न अनुत्तरित राहतात. बनराकस आणि क्रांती देवीने ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकल्याने पुढे काय घडेल? सचिवजींच्या नोकरीचं आणि प्रेमाचं काय होईल? मंजू देवी आणि प्रह्लादचा पुढचा निर्णय काय असेल? या सर्व गोष्टींची उत्तरं प्रेक्षकांना पुढच्या सीझनमध्ये मिळणार आहेत, अशी अपेक्षा आहे.
‘पंचायत सीझन ५’ची उत्सुकता शिगेला
नीना गुप्ता यांच्या या विधानानंतर चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत की, 'सीझन ५' कधी प्रदर्शित होणार. सीरिजचे निर्माते किंवा प्राइम व्हिडीओकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र स्क्रिप्ट तयार असल्याची बातमी समोर आल्याने लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘पंचायत’ या सिरीजने ग्रामीण जीवन, राजकारण आणि साध्या माणसांच्या भावना खूप प्रभावीपणे मांडल्या असून, यामधील पात्र आणि संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. ‘पंचायत सीझन ४’ला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.