Join us

हातात सिगारेट, महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन…; 'ते' पोस्टर पाहून रुपाली चाकणकर संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:35 IST

Rupali Chakankar : जाणून घ्या काय आहे प्रकरण, रुपाली चाकणकर यांनी काय केलं ट्विट?

 काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर #Banlipstic हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडमध्ये होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) पासून प्राजक्ता माळी अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींना हा हॅशटॅग वापरत व्हिडीओ शेअर केले होते. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही...’  असं म्हणत आपली लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश त्यांनी दिला होता. हे प्रकरण काय हे कळायला मार्ग नव्हता. पण कालांतराने हे वेगळं काही नसून प्रमोशनचा फंडा असल्याचं स्पष्ट झालं होतं. प्रमोशन होतं, तेजस्विनी पंडितच्या ‘अनुराधा’  (Anuradha)  नावाच्या वेबसीरिजचं. आता तेजस्विनी ही सीरिज पुन्हा एका वेगळ्या कारणानं चर्चेत आहे. होय, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या सीरिजच्या ठिकठिकाणी लागलेल्या जाहिरातीच्या होर्डिंग्सवर आक्षेप नोंदवत, दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे.

 रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अनुराधा सीरिजच्या जाहिरातीबद्दल अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचं म्हटलं आहे.‘ एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमांमधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत,’असं त्यांनी या ट्विटमध्ये  म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी सीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली आहे. त्या नोटीसचा फोटोही रूपाली यांनी ट्वीटसोबत जोडला आहे. या पोस्टमुळे समाजात धूम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन असा चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तूर्तास रूपाली चाकणकरांचे  हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

 ‘अनुराधा‘ या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सीरिजच्या  निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत आहेत.

टॅग्स :रुपाली चाकणकरतेजश्री प्रधान