शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' सीरिजवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद येत आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या सगळ्यामागे आर्यन खान आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच पहिल्याच सीरिजमध्ये त्याने दिग्गज कलाकारांचा कॅमिओ घेतला आहे. राजामौली, सलमान-शाहरुख-आमिर, रणबीर कपूर, करण जोहर, अर्शद वारसी आणि इम्रान हाश्मी असे सगळेच यामध्ये दिसले आहेत. रणबीर कपूरचा सीन अगदी शेवटी आहे. त्यात तो धूम्रपान करताना दिसतो. मात्र या सीनवेळी कोणतीही सूचना दिली गेल्याने आता रणबीर अडचणीत सापडला आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांना सीरिजचे निर्माते आणि कलाकाराविरोधात एफआयआर दाखल करण्यास सांगितलं आहे. सीरिजमध्ये रणबीर कपूर शेवटच्या सीनमध्ये ई सिगारेट ओढताना दिसतो. तेव्हा कोणतीही चेतावनी लिहून येत नाही. याविरोधात विनय जोशी यांनी एनएचआरसी तक्रार लिहिली आहे. यासोबत एनएचआरसीने माहिती किंवा तंत्रज्ञान मंत्रालय सचिवांना कारवाई करण्याचे आणि अशा गोष्टींवर आळा घालण्याची मागणी केली आहे. या गोष्टी तरुणांना चुकीच्या दिशेला नेत आहेत. तसंच मुंबई पोलिसांना ई सिगारेट विकणाऱ्यांविरोधात तपास करण्यास सांगितलं आहे.
१७ सप्टेंबर २०१९ रोजी केंद्रीय मंत्रालयाने ई सिगारेटवर बंदीचा अध्यादेश काढला होता. या अंतर्गत देशात ना ई सिगारेटचं उत्पादन होईल ना विकली जाईन, ना खरेदी केली जाईल, ना आयात होईल आणि याचा प्रसारही केला जाणार नाही असे आदेश होते. याच आदेशाचं उल्लंघन सीरिजमधून होत आहे. आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपींविरोधात ५ लाखांचा भुर्दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्हीची शिक्षा होऊ शकते.