'पंचायत' ही देशात ओटीटीवर गाजलेली सगळ्यात लोकप्रिय वेब सीरिज आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या तीन भागांना प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर आता पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पंचायत ३'नंतर 'पंचायत ४'ची प्रेक्षक वाट पाहत होते. 'पंचायत ३'नंतर लगेचच त्याच्या पुढच्या भागाचीही घोषणा करण्यात आली होती. आता 'पंचायत ४'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
यंदा फुलेरा गावात निवडणूक होणार आहे. गावचा प्रधान बनण्यासाठी प्रधानजी आणि भूषणमध्ये रस्सीखेच होताना पाहायला मिळणार आहे. रिंकीची मम्मी म्हणजेच मंजू देवी आणि भूषणची पत्नी क्रांती देवी प्रधान होण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचं टीझरमध्ये दिसत आहे. फुलेरामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मंजू देवीचं लॉकी हे चिन्ह आहे. तर क्रांती देवी कुकर प्रेशरच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. 'पंचायत ४' टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
दरम्यान, २०२०मध्ये 'पंचायत' वेब सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, सुनिता राजवर यांच्या मुख्य भूमिका आहेत. २ जुलै रोजी 'पंचायत ४' अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.