Join us

सुपरहिट वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची एन्ट्री, पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 13:58 IST

सई ताम्हणकर, प्रिया बापटनंतर मृण्मयी देशपांडेही हिंदी विश्वात डंका गाजवण्यासाठी सज्ज

सध्या अनेक मराठी कलाकार हिंदी कलाविश्वातही आपला डंका गाजवत आहेत. सई ताम्हणकर, प्रिया बापटनंतर आता मृण्मयी देशपांडेनेही (Mrunmayee Deshpande) तिच्या आगामी हिंदी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 'मुंबई डायरीज' (Mumbai diaries) या गाजलेल्या वेबसिरीजच्या पुढच्या भागात मृण्मयी मुख्य भूमिकेत असणार आहे. मृण्मयीने तिचं पोस्टर शेअर करत सर्वांनाच सरप्राईज दिले आहे.

'मुंबई डायरीज' ही वेबसिरीज २०२१ साली रिलीज झाली. मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, श्रेया धन्वंतरीसह अनेक कलाकारांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. 26/11 मुंबई बॉम्बस्फोट हल्ला कधीही न विसरता येणारी घटना आहे. मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. कित्येक लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना यामध्ये गमावलं. सीएसएटी परिसरात झालेल्या गोळीबारात कित्येक लोक जखमी झाले. त्यांना जवळच्याच कामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत होतं.अशा वेळी स्वत:चं घरदार विसरुन डॉक्टरांनी संपूर्ण ताकद या लोकांचा जीव वाचवण्यासाठी लावली. कमी संसाधनांमध्येही त्यांनी काम केलं. अशावेळी रुग्णालयात नेमकी कशी परिस्थिती असायची याचीच कथा 'मुंबई डायरीज' मध्ये दाखवण्यात आली आहे. आता याचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होतोय. 

दिग्दर्शक निखिल अडवाणी आणि निखिल गोन्जाल्विस यांनी उत्तमरित्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर मोहित रैनाने आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मृण्मयीला या सुपरहिट वेबसिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने ती खूश आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मराठीतील सायली संजीव, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, आदिनाथ कोठारे या कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडेमराठी अभिनेता26/11 दहशतवादी हल्ला