'पंचायत' (Panchayat) या लोकप्रिय वेबसीरिजचा चौथा सीझनचा काही दिवसांपूर्वीच आला. सीरिजने सर्वांना प्रेमातच पाडलं आहे. यावेळी प्रेक्षकांना 'विधायक की बेटी'ची झलक पुन्हा पाहायला मिळाली. याआधी दुसऱ्या एपिसोडमध्येही ती दिसली होती. अभिनेत्री किरणदीप कौरने (Kirandeep Kaur Saran) सीरिजमध्ये चित्रा ही भूमिका साकारली आहे जी विधायकची मुलगी आहे. किरणदीपने याआधीही काही वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकतंच तिने इंडस्ट्रीत तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं.
एबीपी न्यूजशी बोलताना किरणदीप कौरने कास्टिंग काऊचवर भाष्य केलं. तिला सुद्धा कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता असा तिने खुलासा केला. ती म्हणाली, "हो, इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच आहे. एकदा एका बड्या प्रोडक्शन हाऊसच्या कास्टिंग मॅनेजरने माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. मी नंतर त्याच्या या वागण्याची तक्रारही केली होती. माझ्या तक्रारीनंतर त्याला प्रोडक्शन हाऊसने नोकरीवरुन काढून टाकलं होतं."
'पंचायत' सीरिजविषयी ती म्हणाली, "मला या सीरिजने प्रसिद्धी दिली. पण तरी मला नंतर कामासाठी कोणतीही ऑफर आली नाही. मला फक्त विधायक की बेटी हा टॅग मिळाला. सुपरहिट सीरिजमध्ये काम करुनही माझा स्ट्रगल मात्र संपलेला नाही."
किरणदीपने याआधी 'स्कॅम 2003' वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती टीव्हीएफच्या 'सपने व्हर्सेस एव्हरीवन' सीरिजमध्ये झळकली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती जाहिरातीतही दिसली आहे. आता 'पंचायत'च्या पुढील सीझनमध्ये तिची मोठी भूमिका असण्याची शक्यता आहे.