२०२३ मध्ये जेव्हा 'हाफ सीए' (Half CA 2 Web Series) ही वेबसीरिज रिलीज झाली तेव्हा चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या अडचणी प्रत्येकाच्या मनाला भिडल्या. आर्ची मेहता आणि नीरज गोयल यांच्या कथेचा इतका प्रभाव पडला की या मालिकेला आयएमडीबीवर ८.३ रेटिंग मिळाले. आता दोन वर्षांनी त्याचा सीक्वेल येत आहे. निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला आहे. आर्ची आणि नीरजची कथा आता पुढे जाईल. अहसास चन्ना पुन्हा एकदा मुख्य भूमिका आर्ची साकारत आहे.
हाफ सीएच्या दुसऱ्या सीझनचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना आर्ची आणि नीरजच्या आयुष्याची जवळून झलक मिळाली आहे. पहिला हंगाम जिथे संपला तिथून पुढे जात, ही मालिका आर्ची मेहताची व्यक्तिरेखा खुलवते आहे, त्यात आर्ची तीन वर्षांच्या आर्टिकलशिपसह आपल्या व्यग्र अभ्यासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, नीरज गोयल सीएच्या अंतीम परीक्षेच्या शेवटच्या प्रयत्नासाठी सज्ज होतो आहे. परंतु यशाचा मार्ग गुंतागुंतीचा आहे आणि अशास्थितीत त्याचा भूतकाळ पाठलाग करतो आहे. एहसास चन्ना, प्रीत कमानी, ग्यानेंद्र त्रिपाठी, ऐश्वर्या ओझा, अनमोल कजानी आणि रोहन जोशी हे कलाकार दिसणार आहेत. ‘द व्हायरल फीवर’ निर्मित, ततसत पांडे, हरीश पेड्डिंती आणि खुशबू बैद लिखित 'हाफ सीए सीझन २' चे दिग्दर्शन प्रतीश मेहता यांनी केले आहे.
अहसान चन्ना म्हणाली, सीझन १ माझ्यासाठी नेहमीच एक विशेष स्थान राखून ठेवेल कारण आर्चीच्या प्रवासात मी अनेक लोकांशी जोडले गेले आहे. ही व्यक्तिरेखा खरी असल्याने आपलीशी वाटते. सीझन २ मध्ये, आम्ही थकवा, दबाव, आत्म-शंकेच्या वादळात खोलवर बुडी मारत संघर्षाच्या ठिणगीच्या जोरावर पुढे-पुढे जात राहतो. हे सीए विद्यार्थ्यांचे वास्तव आहे-दिवसागणिक ते उलगडून समोर येते आहे. नीरज गोयलच्या भूमिकेत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ग्यानेंद्र त्रिपाठी म्हणाला, हे कथानक म्हणजे निव्वळ अभ्यासाचा विषय नव्हे, तर मैत्री, एकटेपणा, आत्म-शंका आणि प्रत्येक वेळी तुम्ही धडपडाल तेव्हा पुन्हा उठण्यासाठी लागणारे धैर्य कैद करायचे होते. मला विश्वास आहे की हा सीझन तीव्र वैयक्तिक संघर्ष केलेल्या कोणालाही आपलासा वाटेल. हाफ सीए सीझन 2 अमेझॉन एमएक्स प्लेयरवर २७ ऑगस्टपासून पाहता येणार आहे.