'पंचायत' (Panchayat) या वेबसीरिजचे अनेक चाहते आहेत. या सीरिजने सर्वांनाच प्रेमात पाडलं. अगदी हलकी फुलकी कहाणी, दमदार अभिनय यामुळे सीरिज सर्वांचीच आवडती बनली. 'टीव्हीएफ' ओरिजिनल 'पंचायत'चे मेकर्स आता आणखी एक सीरिज घेऊन आले आहेत. 'ग्राम चिकित्सालय' (Gram Chikitsalay) असं सीरिजचं नाव असून आणखी एका गावाची हलकी फुलकी कहाणी यातून पाहायला मिळणार आहे.
'पंचायत' सीरिज टीव्हीएफ बॅनर अंतर्गत बनली आहे. दीपक मिश्रा सीरिजचे क्रिएटर आणि दिग्दर्शक आहेत. आता तेच 'ग्राम चिकित्सालय' ही सीरीज घेऊन येत आहेत. पाच एपिसोड्सची ही सीरिज आहे. शहरी डॉक्टरची ही गोष्ट आहे जो दूर गावात बंद पडत आलेल्या एका स्वास्थ्य केंद्राला पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करतो. या प्रवासात त्याला गावात काय अडचणी येतात, गावकऱ्यांच्या विचित्र शंकांना तो कसा सामोरा जातो हे दाखवण्यात आलं आहे.
'ग्राम चिकित्सालय' मध्ये दिसणार हे कलाकार
'ग्राम चिकित्सालय' सीरिजमध्ये अमोल पराशर आणि विनय पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय आकांक्षा रंजन कपूर, आनंदेश्वर द्विवेदी, आकाश मखिजा आणि गरिमा विक्रांत सिंह यांचीही भूमिका आहे.
'ग्राम चिकित्सालय'ची गोष्ट वैभव सुमन आणि श्रेया श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. तर राहुल पांडेने सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. ९ मे रोजी प्राइम व्हिडिओवर सीरिज प्रदर्शित होणार आहे.