Join us

'पंचायत' वेबसीरिजमधील चंदनला लागली लॉटरी, दोन वेबसीरिज आणि एका सिनेमात लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 18:59 IST

Chandan Roy : २०२० साली प्रदर्शित झालेली वेबसीरिज पंचायतला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. यातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. यात अभिनेता चंदन रायने विकासची भूमिका साकारली होती.

कधी कोणता प्रोजेक्ट कलाकारांना यशाच्या शिखरावर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. २०२० साली प्रदर्शित झालेली वेबसीरिज पंचायतला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. यातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. यात अभिनेता चंदन राय(Chandan Roy)ने विकासची भूमिका साकारली होती. दरम्यान, चंदनला लॉटरी लागली असून या सीरिजच्या तिसऱ्या सीझनसोबत त्याच्याकडे प्रोजेक्ट्सची रांग लागली आहे. यात दोन वेबसीरिज आणि एका सिनेमाचा समावेश आहे. 

दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत चंदन राय म्हणाला की, पंचायत ३ व्यतिरिक्त माझ्याकडे आणखी एक वेबसीरिज आहे भाई ब्रो कॉमरेड. ही सहा भागांची वेबसीरिज आहे. या सीरिजचे दिग्दर्शन रोहन सिप्पी याने केले आहे. त्याचे वडील रमेश सिप्पी यांच्या प्रॉडक्शन हाऊसने याची निर्मिती केली आहे. ही तीन मित्रांची कथा आहे. यात मी डाव्या विचारसरणीचा दाखवलो आहे.

सिनेमातही केलंय काम

तो पुढे म्हणाला की, त्यानंतर आणखी एक वेबसीरिज येणार आहे, ज्याचं नाव मिस्टर सक्सेना आहे. यात जिम्मी शेरगिल मुख्य भूमिकेत आहे. यात मी क्रिकेटरची भूमिका साकारली आहे. याशिवाय मी एका चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव मजनू सलून आहे. ही छोट्या शहरातील कथा आहे. यात मी मुख्य भूमिकेत आहे. हा एक अतिशय गोड विनोदी चित्रपट आहे, जो आम्ही खूप मेहनत घेऊन बनवला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा आमचा विचार आहे. या तिन्ही प्रोजेक्ट्सचे शूटिंग पूर्ण झाले आहे, एकामागून एक रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत.