मराठी मनोरंजन विश्वात एका नवीन वेबसीरिजची चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजचं नाव आहे 'अंधार माया'. काहीच दिवसांपूर्वी या वेबसीरिजची घोषणा झाली. त्यानंतर नुकतंच 'अंधार माया' वेबसीरिजचा ट्रेलर भेटीला आला आहे. पहिल्या मराठी हॉरर ओरिजनल सीरीजचा हा ट्रेलर सर्वांना हादरवणारा आहे एवढं नक्की. किशोर कदम, ऋतुजा बागवे, शुभंकर तावडे या कलाकारांची या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहे. जाणून घ्या.
'अंधार माया' वेबसीरिजचा ट्रेलर
कोकणातल्या गूढ, काळोख्या, पछाडलेल्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात लपून गेलेला, एकेकाळी अभिमानाचा विषय असलेला खातू कुटुंबाच्या पूर्वजांचा वाडा सगळ्यांना एका अंतिम विधीसाठी परत आणतो. मात्र या वाड्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. सगळ्यांची पुन्हा झालेली एक सुंदर भेट म्हणून सुरू झालेला हा प्रवास गडद होत जातो.
कुटुंबात पूर्वापार लपवून ठेवण्यात आलेली गुपितं नकळतपणे वर येतात आणि आणि विचित्र गोष्टी घडायला सुरुवात होते. जसजसे सर्वजण भूतकाळ - वर्तमानात प्रवेश करतात, तसतसे विचित्र घटनांची एक मालिका त्यांचे वास्तव उलगडते. वाड्याची पकड घट्ट होत जाते तसंच काळाच्या चक्राची पुनरावृत्ती होते. कुटुंबातले सदस्य गायब व्हायला लागतात. वाडा पछाडलेला असतो का? सर्वजण अचानक कुठे गायब होतात? या प्रश्नांची उत्तरं 'अंधार माया' वेबसीरिज रिलीज होईल तेव्हाच मिळतील.
ZEE5 वर 'अंधार माया' ही पहिली मराठी हॉरर ओरिजनल सीरीज रिलीज होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी दिग्दर्शित केलेल्या, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्म्स अंतर्गत निर्मिती असलेल्या सीरिजची कथा आणि संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे आहेत. पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली आहे. या सीरीजमध्ये दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेले जबरदस्त अभिनेते किशोर कदम गूढ भूमिकेत दिसतील. रहस्य, गूढरम्य वातावरण आणि भावनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या सीरीजचे प्रीमियर ३० मे रोजी ZEE5 वर होणार आहे.