Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिरचा लेक जुनैदचा पहिला सिनेमा, थिएटरमध्ये नाही तर ओटीटीवर होणार रिलीज; तारीख समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 11:47 IST

'महाराज' या सिनेमातून जुनैद अभिनयात पाऊल ठेलत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती. आता अखेर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लेक जुनैद खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जुनैद खानही अभिनयात त्याचं नशीब आजमावणार आहे. 'महाराज' या सिनेमातून जुनैद अभिनयात पाऊल ठेलत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा सुरू होती. या सिनेमाच्या प्रेक्षक प्रतिक्षेत होते. आता अखेर या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

जुनैद खान पदार्पण करत असलेला 'महाराज' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार नाही. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५ जून रोजी जुनैद खानच्या 'महाराज' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे. तर १४ जूनला ओटीटीवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर जुनैद खानचा 'महाराज' सिनेमा प्रेक्षकांना पाहता येईल. 

'महाराज' सिनेमातून १८६२ सालातील महाराज लिबेल केसची गोष्ट मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. महिला अनुयायांशी अनैतिक संबंध ठेवल्याचा ठपका लावल्याबद्दल एका धार्मिक नेत्याने वृत्तपत्राविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. या वृत्तपत्रातील पत्रकाराची भूमिका साकारताना जुनैद खान दिसणार आहे. 

दरम्यान, या सिनेमानंतर जुनैद आणखी दोन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुनैद खान दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीबरोबर एका सिनेमाचं शूटिंग करत आहे. या शूटिंगदरम्यानचे काही फोटोही व्हायरल झाले होते. याबरोबरच तिसरा प्रोजेक्टही जुनैदच्या हाती लागला आहे. लव टुडे या तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये जुनैद दिसणार आहे. या सिनेमात श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरही दिसणार आहे. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटी