Kankhajura Trailer: सोनी लिव्हवरील आगामी वेबसीरिज ‘कानखजुरा’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. ही वेबसीरिज एका पछाडणाऱ्या गोष्टीची सफर घडवते. जिथे शांततेमागे लपलेली असते एक धोकादायक अंधाराची दुनिया. ‘कानखजुरा’ प्रेक्षकांना अशा भूतकाळात घेऊन जाते जिथून सुटका अशक्य वाटते, आणि जिथे अपराधीभाव सतत पाठ सोडत नाही. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
मूळ इझ्रायली वेबसीरिज ‘Magpie’ वर आधारित असलेली ही भारतीय मालिका एक नवीन रूप घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय देहबोली आणि संवेदनशीलतेशी सुसंगत अशा पद्धतीने सादर करण्यात आलेल्या या रूपांतरात, मूळ कथा आणि भावनिक उत्कटता जपली आहे. कथेच्या केंद्रस्थानी आहे दोन दुरावलेल्या भावांचं नातं. स्मृती आणि वास्तव यांच्या सीमारेषा धूसर होत असताना, त्यांना त्यांच्या काळ्याकुट्ट भूतकाळाचा सामना करावा लागतो. "जर तुमच्याच आठवणी एक अशा तुरुंगात बदलल्या जिथून सुटका नाही, तर काय होईल?" या विचाराभोवती ही मालिका गुंफलेली आहे.
दरम्यान, याबद्दल निशाची भूमिका करणारी सारा जेन डायस म्हणाली, 'कानखजुरा’मध्ये खोलवर ढवळून टाकणारे काहीतरी आहे. ही कथा अस्वस्थ करणारी आहे, पण ती अपराधीभाव, कुटुंब, आणि स्मृती यांचा सामना करायला भाग पाडते. निशा ही व्यक्तिरेखा आतून तुटत असतानाही बाहेरून सावरायचा प्रयत्न करत आहे. ही भूमिका निभावणे खूप आव्हानात्मक होते. एवढे पदर असलेली, बारकावे असलेली व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते पण त्यामुळे मला खूपच सक्षम झाल्यासारखे वाटले."
‘कानखजुरा’ चे दिग्दर्शन चंदन अरोरा यांनी केले असून, अजय राय यांनी निर्मिती केली आहे. या मालिकेत मोहित रैना, रोशन मॅथ्यूज, सारा जेन डायस, महेश शेट्टी, निनाद कामत, त्रिनेत्रा हलदार, हीबा शाह आणि उषा नाडकर्णी यांसारखे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत. ही मालिका 'Yes Studios' कडून परवाना घेऊन, क्रिएटर्स अॅडम बिझान्स्की, ओम्री शेनहर आणि डाना इडन यांच्या संकल्पनेवर आधारित डोना अँड शुला प्रोडक्शन्सच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. 'कानखजुरा' स्ट्रीम होत आहे ३० मेपासून केवळ सोनी लिव्हवर!