भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली जगभरात प्रसिद्ध आहे. विराट त्याच्या खेळाने मैदान गाजवतो आणि त्याच्या कृतीने चाहत्यांची मनं जिंकतो. क्रिकेटविश्वाबरोबरच काही जाहिरातींमध्येही विराट दिसला आहे. कोहलीची पर्सनालिटी एखाद्या अभिनेत्यालाही लाजवेल अशी आहे. पण, आता हुबेहुब विराट कोहली सारखा दिसणाऱ्या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
असं म्हणतात की या जगात एकसारखी दिसणारी ७ माणसं असतात. याआधी अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील. पण, आता चक्क विराट कोहलीसारखा दिसणारा अभिनेता समोर आला आहे. त्याचा चेहरा हुबेहुब विराटसारखा दिसतो. एवढंच नाही तर दाढी वगैरेदेखील सेम टू सेम विराटसारखी आहे. या अभिनेत्याचं नाव कॅविट सेटिन असून तो तुर्कीचा आहे.
Diriliş: Ertuğrul ही तुर्की सीरिज सध्या चर्चेत आहे. या सीरिजमध्ये कॅविट सेटिनने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील लूकमध्ये अभिनेता हुबेहुब विराटसारखा दिसत आहे. या सीरिजमधील त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून खरा विराट ओळखणं अनुष्का शर्मालाही कठीण जाईल असं चाहत्यांनी म्हटलं आहे.
'डिरिलिश: एर्टुगरुल' ही एक ऐतिहासिक सीरिज आहे. या सीरिजमधून १३व्या शतकातील ओटोमन साम्राज्यचे संस्थापक उस्मानचे वडील एर्टुगरुल यांच्या जीवनावर भाष्य करण्यात आलं आहे. २०१४ मध्ये ही सीरिज प्रसारित करण्यात आली होती. ही सीरिज युट्यूबवरही उपलब्ध आहे.