ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांचे काल ३१ डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेसृष्टीवर शोककळा पसरली.
कादर खान यांचा मुलगा सरफराज याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सरफराज याने सांगितले की, माझ्या वडिलांनी काल ३१ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता ( कॅनडाच्या प्रमाणवेळेनुसार) अंतिम श्वास घेतला. दुपारी ते कोमात गेलेत आणि संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गत १६ ते १७ आठवड्यांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. आमचे अख्खे कुटुंब कॅनडात आहे. त्यामुळेच त्यांच्या पार्थिवावर कॅनडातचं अंत्यसंस्कार होतील.
मनमोहन देसाई यांच्यासोबत मिळून कादर खान यांनी धर्मवीर, गंगा जमुनी सरस्वती, कुली, देशप्रेमी, सुहाग, अमर अकबर अँथोनी आदी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. तर मेहरा यांच्यासोबत मिळून ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केले. त्यामुळे अभिनेता, संवाद लेखक शिवाय पटकथा लेखक अशी कादर खान यांची ओळख होती.कादर खान यांनी सुमारे ३०० चित्रपटांत काम केले आणि २५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केले.