Join us  

'हॉटेलवर ये आणि...'; दिग्दर्शकाने मध्यरात्री उपासना सिंहला केला फोन; अभिनेत्रीने आला कास्टिंग काऊचचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 8:59 AM

Upasana singh: अनिल कपूरसोबत उपासनाला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र, दिग्दर्शकाने तिच्याकडे विचित्र मागणी केली. ज्यामुळे उपासना प्रचंड घाबरुन गेली होती.

कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. काही दिवसांपूर्वीच मनीषा रानीने (Manisha Rani) तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला होता. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री आणि द कपिल शर्मा शोमधील बुआ म्हणजेच उपासना सिंहने (Upasana Singh) तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. एका दिग्दर्शकाने मध्यरात्री तिला फोन करुन बोलावलं होतं. या प्रकारानंतर जवळपास ७ दिवस ती घरातून बाहेरही पडली नव्हती.

उपासना सिंहने बॉलिवूडसह मालिका, पंजाबी इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज ती इंडस्ट्रीतील परिचित असलेला चेहरा आहे. आपल्या विनोदी भूमिकांमुळे तिच्या सिनेमातील अनेक भूमिका गाजल्या. अलिकडेच उपासना सिंहने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला.

स्त्रियांसाठी बॉलिवूड सुरक्षित आहे का?

"प्रत्येक प्रोफेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. पण, मला असं वाटतं इंडस्ट्री महिलांसाठी सुरक्षित आहे. कोणीही तुम्हाला इथे कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करु शकत नाही. जर तुम्हाला तुमची क्षमता ठावूक असेल आणि काम मिळण्याची वाट पाहण्याची तयार असेल तर नक्कीच तुम्हाला काम मिळेल. तुम्हाला कोणापुढे झुकावं लागणार नाही. फक्त मेहनत करा."

१७ व्या वर्षी आला कास्टिंग काऊचचा अनुभव

"इंडस्ट्रीतील माझा प्रवास सोपा नव्हता. मला वाईट अनुभवांनाही सामोरं जावं लागलं. मी तर सिनेमात काम करणं सुद्धा सोडून दिलं होतं. मी नाव घेणार नाही पण साऊथच्या एका दिग्दर्शकाने मला अनिल कपूरच्या अपोझिट एका सिनेमासाठी साइन केलं होतं. मी माझ्या नातेवाईकांना सुद्धा याविषयी सांगितलं होतं. पण, दिग्दर्शकांनी मला फोन केला आणि सिटिंगसाठी एका हॉटेलमध्ये बोलावलं. त्यावेळी मी फक्त १७ वर्षांची होते. मी दुसऱ्या दिवशी स्टोरी ऐकायला येते असं मी त्यांना सांगितलं. कारण, त्यावेळी हॉटेलपर्यंत जाण्यासाठी माझ्याकडे कोणतंही वाहन नव्हतं", असं उपासना म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी नकार दिल्यावर 'मी तुझ्यासाठी कार पाठवतो. तुला सिटिंगचा अर्थ माहित नाही का? फिल्म लाइनमध्ये यायचं असेल तर सिटिंग तर करावीच लागते', असं ते दिग्दर्शक म्हणाले.  या प्रकारानंतर मी खूप घाबरले. मी त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटले आणि खूप सुनावलं. मी सिखनी आहे. तुम्ही असं कसं काय मला बोलू शकता. तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात मग माझ्याविषयी असा विचार कसा काय करु शकता?. मी त्या दिवशी खूप रडले. जवळपास ७ दिवस मी घरातून बाहेर पडले नव्हते. "

दरम्यान, उपासनाच्या आईने तिची समजूत घातली आणि त्यानंतर उपासना सगळं विसरुन पुन्हा इंडस्ट्रीत काम करायला लागली. मात्र, तिने अनिल कपूरच्या अपोझिट असलेला सिनेमा सोडला. 

टॅग्स :बॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमाअनिल कपूर