अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) आणि अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग (Kshiti Jog) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहेत. हे जोडपे सतत चर्चेत येत असतात. त्यांनी बऱ्याच चांगल्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता लवकरच त्यांचा 'फसक्लास दाभाडे' (Fasclass Dabhade) हा चित्रपट भेटीला येतो आहे आणि सध्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. दरम्यान आज हेमंत ढोमेने खास पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट चर्चेत आली आहे.
हेमंत ढोमेने इंस्टाग्रामवर त्याच्यासोबत क्षितीचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, यळकोट यळकोट जय मल्हार! चलचित्र मंडळी या आपल्या निर्मिती संस्थेचा चौथा चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ परवा पासून तुमच्या भेटीला येतोय… म्हणजे माझं आणि क्षितीचं चौथं बाळ! हे बाळ आमच्यासाठी जरा स्पेशल आहे… कारण हे आपल्या मातीतलं आहे… रांगडं आहे अस्सल आहे… पण खूप मायाळू आहे! याआधी आमच्या तीनही बाळांना तुम्ही खूप प्रेम दिलंत… अंगा खांद्यावर खेळवलंत! तसंच किंवा त्याहून अधिक प्रेम तुम्ही या बाळावर कराल याची खात्री आहे!
हेमंत ढोमेने पुढे म्हटले की, आपण आख्ख्या फॅमिली सोबत सिनेमा बघणं हळूहळू विसरत चाललो आहोत… त्याला अनेक कारणं आहेत, पण फसक्लास दाभाडे हा सिनेमा तुम्हाला तुमच्या सख्या-चुलत-मानलेल्या सगळ्या कुटुंबासोबत एकत्र बसून बघता येईल आणि तुमचं भरघोस मनोरंजन होईल असाच बनवला आहे… तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला एकत्र घेऊन जायचं आहे! हा सिनेमा म्हणजे आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला मारलेली मायेची घट्ट मिठी आहे!
२४ जानेवारीला 'फसक्लास दाभाडे' येणार भेटीला
आता एकत्र यावंच लागतंय! २४ जानेवारी पासून तुमच्या जवळच्या, लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन आपल्या कुटुंबाचा हा सिनेमा नक्की बघा! आणि तुमचं आमचं नातं असं आहे की जे काही वाटलं ते हक्काने सांगा! चांगभलं!!!, असे ढोमेने पोस्टमध्ये लिहिलंय.