सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थ जाधवने इंडस्ट्रीतील प्रवास आणि आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. यावेळी त्याने त्याला पूर्वी आणि आजही दिसण्यावरून हिणवले जाते, यावर भाष्य केले. त्याने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.
सिद्धार्थ जाधवने कॅचअप या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ''ही जी आपल्या कौतुकाची थाप कुठून आहे, तर मराठी इंडस्ट्रीमुळे आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमामुळे तर मला ते आवडतंय. बाकी हे बघ कोण, कसे रे अजून, कसे तुझे दात, कसा दिसतो, कसं रे घालतो. थँक्यू थँक्यू चल पुढे. आता आपण ना फक्त आई बहिणीवर शिव्या घातल्या की थोडं वाईट वाटतं आणि त्याला मी, ते तर मी लक्षच देत नाही. पण ते ते महत्त्वाचं नाही. पण कोण समजवायला गेलं. जसं म्हणलं की अरे जरा नीट वाग. नीट वाग म्हणजे कसं? नीट म्हणजे काय?.''
''तेच माझ्या अंगात भिनलंय''
तो पुढे म्हणाला की, ''मी ज्या झोपडपट्टीमधून आलोय महात्मा गांधी स्मृती वसाहत तिकडे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, ख्रिसमस, गणपती, दिवाळी सगळं ह्या पद्धतीने साजरे करायचे ना. त्याच प्लॅटफॉर्मवर, त्याच स्टेजवर, कुठेतरी वक्तृत्व स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा हेच करून आमचा आत्मविश्वास वाढला आहे ना. तर मी तसाच आहे. तेच माझ्या अंगात भिनलंय.''