Join us

सैफ अली खानला हॉस्पिटलला नेणाऱ्या रिक्षा चालकानं सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:24 IST

मानेला आणि पाठीमागून रक्त लागले होते. शरीरावर जखमा होत्या. मी पाहून हैराण झालो असं त्याने सांगितले.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी अज्ञाताने चाकू हल्ला केला. मध्यरात्री चोरीच्या हेतून सैफच्या घरात घुसलेल्या व्यक्तीने सैफवर चाकूने ६ वार केले. या घटनेनंतर सैफ अली खानला तात्काळ लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सैफची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. अभिनेत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर एका सामान्य रिक्षा चालकाने त्याला हॉस्पिटलला पोहचवले. त्या रात्री काय घडलं याबाबत संबंधित रिक्षा चालकाने समोर येऊन खुलासा केला आहे.

रिक्षाचालक म्हणाला की, मी वांद्रे परिसरातून चाललो होतो. त्यावेळी अचानक मला आवाज आला. एक महिला लांबूनच रिक्षा रिक्षा करून जोरजोरात आवाज देत होती. मी घाबरलो. त्यानंतर रिक्षा युटर्न करून लगेच तिच्याकडे गेलो. सोसायटीच्या गेटजवळ रिक्षा थांबवली तेव्हा मी तो सैफ अली खान आहे हे पाहिले नाही. तो जखमी आहे. त्याने पांढरा कुर्ता घातला होता त्यावर सगळीकडे रक्ताचे डाग होते. मानेला आणि पाठीमागून रक्त लागले होते. शरीरावर जखमा होत्या. मी पाहून हैराण झालो असं त्याने सांगितले.

लिलावतीला पोहचलो, तेव्हा गेटजवळ रुग्णवाहिका होती. ईमरजन्सी आहे कळताच रुग्णवाहिका हटवली आणि रिक्षा पुढे लावली. त्यानंतर उतरताना मी तो सैफ अली खान आहे हे पाहिले. माझ्यासोबत एक सेलिब्रिटी आहे आणि तोही अशा अवस्थेत होता. खांद्याला लागले होते, रक्त कपड्यांना लागले होते. ते स्वत: चालत होते, त्यांच्यासोबत १ पुरुष आणि छोटा मुलगा होता. तिथे कोण कोण होते मी एवढे लक्ष दिले नाही. जखमी व्यक्तीला हॉस्पिटलला पोहचवायचं होते. ७-८ मिनिटे घरापासून हॉस्पिटलला पोहचायला लागले असंही रिक्षा चालकाने म्हटलं.

दरम्यान, सैफ अली खान घाबरलेल्या अवस्थेत नव्हते. ते त्यांच्या मुलाशी इंग्लिशमध्ये बोलत होते. मी सोसायटीच्या बाहेरच होतो, सैफ अली खान चालत बाहेर आले. तिथून आम्ही लिलावती हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला स्क्रेचरने त्यांना आत घेऊन गेले. या अवस्थेत असताना मी त्यांना पैसेही मागितले नाहीत, ५०-६० रुपये भाडे झाले असेल पण त्यांचा जीव वाचणं महत्त्वाचे होते. इतका मोठा सेलिब्रिटी आपल्या रिक्षात बसला हेच मोठे आहे. तो सैफ अली खान आहे हे मला हॉस्पिटलला समजलं असं रिक्षाचालकाने सांगितले.  

टॅग्स :सैफ अली खान