Join us
Daily Top 2Weekly Top 5

जग एक रंगभूमी..; बहुचर्चित 'जोकर 2' चं पहिलं पोस्टर रिलीज, या तारखेला येणार ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 10:54 IST

बहुचर्चिक 'जोकर' च्या पुढच्या भागाचा अर्थात जोकर 2 चं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून ट्रेलर कधी येणार जाणून घेण्यासाठी बातमी वाचा

2019 साली आलेल्या 'जोकर' सिनेमाने सर्वांची पसंती मिळवली. जगभरात रिलीज झालेल्या या सिनेमाने भारतात सुद्धा प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. 'बॅटमॅन' सिरीजमधल्या गाजलेल्या जोकर व्यक्तिरेखेवर आधारित स्वतंत्र सिनेमा 'जोकर' पाहून अनेकांनी सिनेमाचं कौतुक केलंय. आता ५ वर्षांनी 'जोकर'चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं असून रिलीज डेटवरील पडदाही उठला आहे.

'जोकर'चं पहिलं पोस्टर रिलीज झालंय. यात जोकरची भूमिका साकारणारा जॅकलीन फिनिक्स रोमँटिक अंदाजात बघायला मिळतोय. तो लेडी गागासोबत डान्स करताना दिसतोय. 'जोकर: फॉली अ ड्यूक्स' (Joker: folie à deux) असं जोकरच्या पुढील भागाचं नाव असणार आहे. आर्थर फ्लेक अर्थात जोकरची पहिल्या भागातील मानसिक अवस्था सर्वांनी बघितली. दुसऱ्या भागात आर्थरची रोमँटिक बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

'हँगओव्हर' फेम टोड फिलिप्स या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने जगप्रसिद्ध संगीतकार, गायक, गीतकार लेडी गागाचा अभिनय आविष्कार रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. ९ एप्रिलला सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. ४ ऑक्टोबर २०२४ ला 'जोकर: फॉली अ ड्यूक्स' सिनेमा रिलीज होणार आहे. जगभरातले चाहते 'जोकर'चा सिक्वेल बघण्याची वाट बघत आहेत.

टॅग्स :हॉलिवूड