Join us

‘त्या’ रात्री माज उतरला आणि भानावर आलो; केदार शिंदेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 07:04 IST

घरी जाताना अचानक पोलिसांची जीप समोर आली आणि त्यांनी आम्हाला हटकलं. सगळेजण थोडे चपापले, घाबरले.

माझ्या आयुष्यात घडलेला हा किस्सा त्या काळातील आहे, जेव्हा आम्ही एकांकिकांच्या विश्वात रमलो होतो. आता नाटक, सिनेमा, मालिका या तिन्ही क्षेत्रांमध्ये थोडं थोडं का होईना नाव कमावलेलं आहे. जेव्हा काहीच नाव नव्हतं, ओळख नव्हती तेव्हा अशी काहीतरी फजिती उडावी, जिथून आपल्याला एक प्रेरणा मिळावी की आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. हा किस्सा रात्री दीड वाजता घडलेला आहे. त्यावेळी मी माझ्या आजोबांच्या म्हणजेच शाहीर साबळेंच्या घरी राहायचो. मी शाहीर साबळेंचा नातू असल्याचा मला त्यावेळी प्रचंड अभिमान आणि माज होता. रात्री उशिरापर्यंत आमच्या एकांकिका स्पर्धा चालायच्या. अशीच एक स्पर्धा आटोपल्यानंतर मी, अंकुश चौधरी, भरत जाधव, संतोष पवार आणि आमचा मित्र राजेश शिंदे साईबाबा मार्गावरून घरी जात होतो. साईबाबा मार्ग म्हणजे करी रोडकडून भारतमाता सिनेमागृहाकडे आल्यावर थेट सरळ बेस्ट वसाहतीकडून काळाचौकीकडे जाणारा मार्ग...

घरी जाताना अचानक पोलिसांची जीप समोर आली आणि त्यांनी आम्हाला हटकलं. सगळेजण थोडे चपापले, घाबरले. मी सगळ्यांना सावरलं आणि म्हणालो, मी जाऊन बोलतो. त्या जीपमध्ये पुढच्या सीटवर एक इन्स्पेक्टर बसला होता. त्याने विचारलं, काय रे... रात्रीचं काय करताय इथे? खरं तर मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं होतं, पण त्यापुढे तो काही बोलणार इतक्यात मी प्रचंड माजात, स्वाभिमानानं आणि अभिमानानं म्हणालो, मी शाहीर साबळेंचा नातू आहे. त्यावर तो शांतपणे मला म्हणाला, मग काय आजोबांनी सांगितलंय का, रात्री-अपरात्री फिरायला... असा मारीन ना... ताबडतोब निघायचं आणि घरी जायचं, कळलं... त्या रात्री मला आयुष्यात मिळालेली ती ‘किक’ होती. त्यानंतर मी आयुष्यात कधीही, कोणालाही ‘मी शाहिर साबळेंचा नातू आहे’, असं सांगितलं नाही. त्या दिवसापासून मी केदार शिंदे हे नाव प्रस्थापित करण्याचा अव्याहत प्रयत्न सुरू केला, जो अद्यापही सुरूच आहे. आज ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट बनवताना पदोपदी हे जाणवतं की, मी शाहीर साबळेंचा नातू असल्याने हा सिनेमा करत नसून माझे आजोबा ग्रेट असल्याने मी हा सिनेमा दिग्दर्शित-निर्मित करत आहे. 

टॅग्स :केदार शिंदे