Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्यात जीव रंगला, खुलता कळी खुलेना आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांना मिळणार वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 12:35 IST

नाताळच्या निमित्ताने तीन मालिकांचे एक तासांचे विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये राणा आणि अंजली यांच्यातील प्रेमकथा ...

नाताळच्या निमित्ताने तीन मालिकांचे एक तासांचे विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये राणा आणि अंजली यांच्यातील प्रेमकथा आता फुलू लागलीय. शरीराने आडदांड असलेला कुस्तीवीर पण स्वभावाने लाजराबुजरा असलेल्या राणाला आपल्या आयुष्यात काहीतरी आगळंवेगळं घडलंय याची चाहूल लागली आहे. तर दुसरीकडे अंजलीने त्याला त्याची जीवनसाथी शोधून देण्याचे आश्वासन दिलेय. पण ती जीवनसाथी नेमकी कोण याचा उलगडा लवकरच राणाला होणार आहे आणि हा उलगडा होणार आहे हुरडा पार्टीमध्ये. राणाच्या शेतावर गायकवाड कुटुंबीय हुरडा पार्टीचा आनंद घेणार आहेत आणि त्यात या कुटुंबासोबतच गावकरीही सहभागी होणार आहेत. याशिवाय अंजलीसुद्धा या पार्टीसाठी विशेष निमंत्रित असणार आहे. हे सगळे ‘तुझ्यात जीव रंगला’ या कार्यक्रमाच्या महाभागात. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘खुलता कळी खुलेना’मध्ये विक्रांत आणि मानसी यांची मैत्री एकीकडे दृढ होते तर दुसरीकडे मोनिकासोबतचं नातं कायमचं तोडून त्या तणावातून मुक्त होण्याचा निर्णय विक्रांतने घेतला आहे. समजुतदारपणे घटस्फोट घेण्याची मागणी त्याने मोनिकाकडे केलीय. विक्रांतची ही मागणी मोनिकाने सध्या तरी मान्य केलीय पण त्यासाठी काही काळ त्याच्याच घरी राहण्याची अट तिने त्याला घातलीय. दरम्यान एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी मानसी विक्रांतसोबत जाणार आहे. घरात चाललेल्या तणावाच्या वातावरणातून बाहेर येऊन थोडा मोकळा वेळ मिळेल या उद्देशाने विक्रांतसुद्धा तिकडे जाण्यास तयार होणार आहे. याच कॉन्फरन्समध्ये या दोघांच्या अव्यक्त भावना मोकळ्या होतील आणि त्यांच्या नात्याला सापडेल एक नवी दिशा.  ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये गुरुनाथच्या आईवडिलांना प्रभावित करण्यासाठी शनाया अनेक युक्त्या आखतेय. पण शनायाचा प्रत्येक डाव राधिका उधळून लावतेय. ख्रिसमस निमित्त गुरुच्या कॉलनीत विशेष कार्यक्रम आखला जातोय आणि त्यात विविध स्पर्धांबरोबरच ‘वुमन ऑफ द इयर’ ही स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत शनायासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभी ठाकते राधिका... एवढंच नाही तर ती शनायाला आव्हान सुद्धा देते की, या स्पर्धेत ज्या कुणाची हार होईल तिने ही सोसायटी सोडून जायचं. यामुळेच शनाया ही स्पर्धा येनकेनप्रकरेण जिंकण्यासाठी सज्ज झालीय.