Join us

"तुम्ही नाही आहात हे पचवणं अजूनही...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 15:44 IST

Seema Ghogale : अभिनेत्री सीमा घोगळे हिने इंस्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्र घराघरात पोहचली आहेत. या मालिकेत विमलची भूमिका अभिनेत्री सीमा घोगळे (Seema Ghogale) हिने साकारली आहे. सीमा सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर वडिलांसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री सीमा घोगळे हिने इंस्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले की, बाबा....आज ५ वर्ष झाली.......तुम्ही नाही आहात हे पचवणं अजूनही जड जातंय,पण मी ठिक आहे काळजी करू नका.... शेवटच्या श्वासापर्यंत स्पर्धेचं सगळं नियोजन नीट झालंय ना ह्याची काळजी होती तुम्हाला तुमचा हा वारसा पुढे न्यायला थोडी कमी पडतेय मी, पण मी ठिक आहे काळजी करू नका..... माझ्या वाढदिवसाला, सणासुदीला १५ दिवस अगोदर खरेदीला पैसे द्यायचात तुम्ही,आता माझी मीच खरेदी करते पण मी ठिक आहे काळजी करू नका....माझ्या नाटकाचा प्रयोग कसा झाला, आज शूटिंगला किती सीन झाले किंवा तुमच्या स्वभावानुसार क्वचित कधीतरी छान झालं काम असं म्हणायचात आता तुमची ती दाद मिळत नाही, पण मी ठिक आहे काळजी करू नका....

तिने पुढे लिहिले की, जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी घरी परत आल्यावर तुम्ही असायचात दार उघडायला आता कुलूप उघडून माझी मीच येते कारण दार उघडायला तुम्ही नाहीत, पण मी ठिक आहे काळजी करू नका.... एका मुलीसाठी सगळ्यात सुरक्षित जागा कुठली असेल तर तिच्या बाबांचं छत्र तिच्या डोक्यावर असणं तुम्ही गेलात, पण मी ठिक आहे काळजी करू नका....सीमा अनंत घोगळे म्हणून मी सगळ्या जबाबदाऱ्या चुकत माकत का होईना पार पाडल्या, ह्यापुढेही पाडेन तुम्ही फक्त सोबत रहा... आणि मी ठिक आहे खरंच काळजी करू नका. तुमची खूप आठवण येते. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका