Join us

'अश्विनीच्या या संपूर्ण प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात…', अभिनेत्री दीपा चौधरीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 17:18 IST

Deepa Parab-Chaudhari : तू चाल पुढं मालिकेत अश्विनीची भूमिका अभिनेत्री दीपा परब-चौधरी हिने साकारली आहे.

झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं (Tu Chaal Pudha) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अश्विनीने घराघरात आपले स्थान निर्माण केले आहे. अश्विनीची भूमिका अभिनेत्री दीपा परब-चौधरी (Deepa Parab-Chaudhari) हिने साकारली आहे. दीपाने या मालिकेतून बऱ्याच वर्षानंतर कमबॅक केले आहे. तिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसते. दरम्यान आता दीपाने मालिकेचे ३०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री दीपा चौधरी हिने इंस्टाग्रामवर मालिकेतील तिच्या लूकचे फोटो व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आज ‘तू चाल पुढं’ मालिकेचे ३०० भाग पूर्ण होणार आहेत. गृहिणी म्हणून सुरू झालेल्या अश्विनीच्या या संपूर्ण प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात… तिच्या प्रत्येक सुख-दुःखात तिच्या पाठीशी आहात… तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद सदैव असेच पाठीशी राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तू चाल पुढं मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. शिल्पी आणि विद्युतचा घटस्फोट झालेला असताना आता अश्विनी आपला भाऊ विद्युतला दुसऱ्या लग्नाचा सल्ला देणार आहे. अश्विनीच्या मनात कार्तिकी आणि विद्युतला एकत्र आणण्याचा विचार आहे. पण त्याचवेळी आता शिल्पी मोठा खुलासा करणार आहे. ज्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात एक नवीन वादळ येणार आहे. अश्विनीला हे ऐकून धक्का बसतो. आता यावर अश्विनीसह घरातल्यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.