दिवाळीत फटाके उडवताना काळजी घेण्याचं आवाहन वेळोवेळी केलं जातं. काळजीपूर्वक फटाके न उडवल्याने आपण आपल्यासोबत इतरांचंही नुकसान करू शकतो. असंच काहीसं एका अभिनेत्रीसोबतही झालं आहे. दिवाळीचा रॉकेट फटाका अभिनेत्रीच्या कारवर येऊन पडल्याने तिच्या गाडीचा नुकसान झालं आहे. पण, हे रॉकेट जर समोरच्या काचेतून कारमध्ये घुसलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
अभिनेत्री यामिनी मल्होत्रासोबत हा प्रकार घडला आहे. यामिनीचा एक व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती म्हणते, "चालत्या गाडीवर रॉकेट येऊन पडलं. नशीब रॉकेट काचेतून गाडीत घुसलं नाही. जर आतमध्ये घुसलं असतं तर माझ्यावर येऊन पडलं असतं. देवाची कृपा की मी यातून वाचले. पण, मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की प्लीज रॉकेट उडवू नका. रॉकेट खूप नुकसान करू शकतं. तुमची छोटीशी मजा कोणासाठी जीवघेणी ठरू शकते. मला काहीही होऊ शकलं असतं. त्यामुळे प्लीज रॉकेट उडवू नका. दुसरे कोणतेही फटाके उडवतानाही काळजी घ्या".
यामिनी मल्होत्रा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक डेन्टिस्टही आहे. यामिनी मॉडेलिंगही करते. काही पंजाबी आणि तेलुगु सिनेमांमध्येही यामिनीने काम केलं आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.