पुढचे पाऊलमध्ये रंगणार कुस्तीचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 15:47 IST
सुलतान, दंगल या चित्रपटामुळे सध्या कुस्ती या खेळाची सगळीकडेच चर्चा होत आहे. दंगल या चित्रपटाने तर आतापर्यंत सगळ्यात जास्त ...
पुढचे पाऊलमध्ये रंगणार कुस्तीचा सामना
सुलतान, दंगल या चित्रपटामुळे सध्या कुस्ती या खेळाची सगळीकडेच चर्चा होत आहे. दंगल या चित्रपटाने तर आतापर्यंत सगळ्यात जास्त बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करण्याचा विक्रम रचला आहे. त्यामुळे कुस्ती या खेळाचा ट्रेंड सध्या सगळीकडेच दिसून येत आहे. छोट्या पडद्यावरदेखील हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे. बढो बहू या मालिकेत प्रिन्स नरुला एका कुस्तीवीराची भूमिका साकारत आहे आणि आता पुढचे पाऊल या मालिकेत प्रेक्षकांना कुस्तीचा सामना पाहायला मिळणार आहे.पुढचे पाऊल या मालिकेत अक्कासाहेब देशमुख यांचा मुलगा समीर आणि रावसाहेब दांडगे पाटील यांचा मुलगा टायगर यांच्यात कुस्तीचा सामना रंगणार आहे. हा केवळ कुस्तीचा सामना नसून दोन्ही कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ठरणार आहे. या मालिकेत नेहमीच अक्कासाहेब सामाजिक समस्यांवर भाष्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतादेखील त्यांनी रावसाहेबांविरोधात विडा उचलला आहे. रावसाहेबाच्या मुलीचे तेजूचे सत्यजित नावाच्या मुलावर प्रेम आहे. पण जातीपातीच्या संघर्षात रावसाहेबांनी या दोघांना मारण्याचा निर्णय घेतला होता. पण अक्कासाहेबांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले आणि सत्यजीतला दत्तक घेऊन सरदेशमुख घराण्याचे नाव त्याला दिले. पण रावसाहेबांसाठी जातीची प्रतिष्ठा हीच सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्यामुळे त्यांनी अक्कासाहेबांना कुस्तीचे आव्हान देऊन या प्रकरणाचा अंतिम निर्णय घ्यायचे ठरवले आहे. अक्कासाहेबांचा मुलगा समीर तेजूला आपल्या बहिणीप्रमाणेच मानतो. त्यामुळे टायगरशी कुस्ती खेळायला तो तयार होणार आहे. आता या सामन्याचा विजेता कोण ठरतो आणि त्यानंतर कथानक कुठले नवे वळण घेतेय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.