का आली कपिल शर्मावर बसने प्रवास करण्याची वेळ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:18 IST
कपिल शर्माच्या कॉमेडी नाईटस विथ कपिल या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कार्यक्रमामुळे कपिल शर्मा छोट्या पडद्यावरचा ...
का आली कपिल शर्मावर बसने प्रवास करण्याची वेळ?
कपिल शर्माच्या कॉमेडी नाईटस विथ कपिल या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या कार्यक्रमामुळे कपिल शर्मा छोट्या पडद्यावरचा स्टार बनला होता. बॉलिवूडमधील स्टार देखील त्याच्या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास प्राधान्य देत होते. पण कलर्स वाहिनीसोबत झालेल्या वादानंतर हा कार्यक्रम बंद झाला. त्यानंतर या कार्यक्रमाच्या टीमला सोबत घेऊन कपिल शर्माने सोनी वाहिनीवर द कपिल शर्मा हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. पण कपिल शर्मा, सुनिल ग्रोव्हर, अली असगर, किकू शारदा असे त्याच्या टीममधील सगळे एका शो साठी सिडनीला गेले असता विमानातून परतताना कपिलने दारुच्या नशेत सुनिल ग्रोव्हरसोबत भांडणं केली. एवढेच नव्हे तर त्याने त्याच्यावर हात देखील उगारला असे म्हटले जाते. त्यामुळे सुनिलने द कपिल शर्मा शो ला रामराम ठोकला. त्याच्यासोबत अली असगरने देखील हा कार्यक्रम सोडला. सुनील आणि अलीने कार्यक्रम सोडल्यानंतर या कार्यक्रमाचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत गेला आणि त्यात कपिल शर्मा सतत आजारी असल्याने ऐनवेळी या कार्यक्रमाचे चित्रीकरण रद्द केले जात होते. या सगळ्या कारणांमुळे हा कार्यक्रम काही दिवसांच्या ब्रेक वर गेला. दरम्यानच्या काळात कपिल फिरंगी या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडेल अशी त्याला खात्री होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे आता कपिल पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आहे.सोनी वाहिनीवर कपिलचा नवीन शो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कपिलचा हा नवा शो काय असणार आहे याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे. पण त्याच्या या शो द्वारे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवणार अशी सगळ्यांना खात्री आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोसाठी कपिलने नुकतेच चित्रीकरण केले. छोट्या पडद्यावर परतण्यासाठी कपिल रिक्षा आणि बस पकडत आहे असे या प्रोमोत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच त्याचे बसमधून प्रवास करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. Also Read : कपिल शर्मा सांगतोय, या गोष्टीमुळे झाला फिरंगी फ्लॉप