Join us
Daily Top 2Weekly Top 5

​यामुळे बरखाची मुलगी तिच्यावर रागावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 17:02 IST

नामकरण या मालिकेत बरखा बिष्ट अवनी या मुलीच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहे. खऱ्या आयुष्यातही तिला एक मुलगी आहे. तिची ...

नामकरण या मालिकेत बरखा बिष्ट अवनी या मुलीच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहे. खऱ्या आयुष्यातही तिला एक मुलगी आहे. तिची मुलगी मीरा ही नामकरण या मालिकेची चाहती असल्याने ती या मालिकेचा एकही भाग चुकवत नाही. या मालिकेतील काही प्रसंग तर तिला इतके आवडतात की, बरखा घरी गेल्यानंतर ते प्रसंग ती तिला करून दाखवायला सांगते. मीरा ही वयाने खूप लहान असल्याने तिची आई एका मालिकेत केवळ काम करते आणि याचा खऱ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही हे तिला कळतच नाही. मीराला हे कळावे यासाठी नुकतीच बरखा तिला मालिकेच्या सेटवर घेऊन गेली होती. पण सेटवर एक वेगळाच किस्सा घडला. मीराला बरखा सेटवर घेऊन गेली, त्यावेळी बरखाला अवनीला जवळ घेऊन शांत करायचे असे दृश्य चित्रीत करायचे होते. पण या दृश्याच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्यानंतर मीराला प्रचंड राग आला. आपली आई दुसऱ्या कोणाला जवळच कशी घेऊ शकते असे तिचे म्हणणे होते आणि तिने जोरात रडायला सुरुवात केली. बरखाला चित्रीकरण थांबवून तिला जवळ घ्यावे लागले. तरीही काही केल्या मीरा तिच्याशी बोलायला तयारच नव्हती. आईसोबत मी बोलणारच नाही असेच काहीसे तिने ठरवले होते. मीराचे हे निरागस वागणे पाहून बरखाला हसू आवरत नव्हते. बरखा सांगते, "मीरा ही माझ्या बाबतीत खूप पझेसिव्ह आहे. त्यामुळे मी आर्शीनला जवळ घेतल्याचे तिला आवडले नाही. पण मी तिची समजूत काढल्यानंतर ती लगेचच शांत झाली."