Join us

दिग्रसकरांच्या गादीचा मान कोणाला मिळणार? 'इंद्रायणी' मालिकेत नवीन वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:53 IST

'इंद्रायणी' मालिकेत नवीन वळण येणार असून या मालिकेत नवीन ट्विस्ट अँड टर्न येणार आहे

'इंद्रायणी' मालिकेत सध्या बऱ्याच घटना घडत आहेत परंतु त्यातील महत्वाची बाब म्हणजे दिग्रसकरांच्या गादीचा मान कोणाला लाभणार ? विठूरायाच्या मंदिरात रंगणार निर्णायक संघर्ष. भक्ती, कर्तृत्व आणि निष्ठेचा लागणार कस. दिग्रसकर वंशपरंपरेची गौरवशाली गादी जिच्यावर बसण्याचा मान मिळणं ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते त्या गादीभोवती आज सगळं गाव एकवटलंय. पण, यंदा केवळ वंशाच्या आधारावर हा निर्णय होणार नाही, असं चित्र स्पष्ट होऊ लागलंय. गावकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने अधोक्षजचा कीर्तन सोहळा ऐकायला जमणार असून, त्याच्या वाणीतील अडखळण्यामुळे तो चेष्टेचा विषय बनणार का?  

व्यासपीठावर उभं राहून आपल्या मर्यादा स्वीकारणारा अधोक्षज, आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभी असलेली इंदू हे चित्र अनेकांच्या मनाला स्पर्शून जाणार असणार आहे. गादीवर कोण बसेल हे अजून स्पष्ट झालेले नाही, पण ज्याने विठ्ठलावर निष्ठा ठेवून भक्तीमार्ग सोडला नाही, त्याचाच विजय होईल असं आता गावातही ऐकू येऊ लागलंय. हा केवळ एक गादीचा वाद नाही, तर परंपरा आणि श्रद्धेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. बघूया हा मान कोणाला मिळणार ? अधोक्षजला गादीवर बसवण्याचे आनंदीबाईंचे स्वप्न पूर्ण होणार का ? 

अधोक्षजच्या पहिल्याच कीर्तनात जेव्हा गावकऱ्यांनी त्याची टवाळी केली, तेव्हा इंदूचं संयम राखणं, तिच्या डोळ्यातला कळवळा आणि गोपाळसारख्या नातेवाइकांच्या कुजकटपणाला न भिडणारी तिची श्रद्धा याने ती एका सच्च्या कीर्तनकाराच्या बायकोपेक्षा अधिक काहीतरी ठरू लागली आहे. पण या सर्व प्रकारावर एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो कीर्तन ही केवळ वाणीची कला आहे का, की त्यामागे भक्ती, निष्ठा, सेवा आणि सत्यतेची झळक असावी लागते? अधोक्षजला पाठिंबा देताना इंदू स्वतःवर येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरी जातेय. गावकऱ्यांनी जरी तिच्या विरोधात सूर लावला असला तरी दिग्रसकरांच्या “गादीवर कोण बसणार?” या थेट प्रश्नाने चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आणली आहे.

दरम्यान, इंदूवर आजवर आलेली संकटं गावकऱ्यांच्या अविश्वासापासून ते पतीच्या मानसिक संघर्षांपर्यंत तिने पार केली आहेत. तिची भक्ती, तिचं कर्तृत्व आणि तिचं संकल्पबळ आता केवळ तिच्या पतीपुरतं मर्यादित न राहता, गावाच्या भवितव्यावर परिणाम करणारं ठरणार आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या एका निर्णयाकडे  गादीचा मान कोणाला मिळणार? अशाप्रकारे 'इंद्रायणी' मालिकेतील नवीन वळण दररोज संध्याकाळी ७ वाजता बघायला मिळेल.

टॅग्स :मराठीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन