Join us
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या रंगात माखलेली ही मराठमोळी अभिनेत्री कोण ओळखा पाहू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 13:41 IST

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोनं अवघ्या महाराष्ट्राला हसवत मनोरंजन केलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी ...

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोनं अवघ्या महाराष्ट्राला हसवत मनोरंजन केलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी रसिकांवर चला हवा येऊ द्या या शोनं जादू केली आहे. या शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या विनोदवीरांमध्ये आणखी एक नाव आवर्जून घ्यावं लागेल. विनोदवीर पुरुषांमध्ये श्रेया बुगडे हिने आपल्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांच्या काळजात वेगळं स्थान मिळवलं आहे. महिला कॉमेडीयन म्हणून श्रेयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच श्रेया बुगडेबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात. सोशल मीडियावरही श्रेयाची बरीच चर्चा असते. तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात. श्रेयाचा असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.श्रेयाचा हा फोटो पाहून तुम्हाला तो तिच्या एखाद्या स्कीटचा असेल असं वाटेल. मात्र श्रेयाचा हा फोटो तिच्या प्रत्यक्ष जीवनातील आहे. हा फोटो श्रेयाच्या लग्नाआधीचा म्हणजेच हळदीच्या दिवसाचा आहे. या फोटोत बाशिंग बांधलेल्या श्रेयाचा चेहरा हळदीने माखलेला पाहायला मिळत आहे. रेशीमगाठीत अडकण्याआधीचा उत्साह आणि आनंद तिच्या चेह-यावर पाहायला मिळत आहे. या फोटोत श्रेयासह पीयूष रानडे आणि तेजस्विनी पंडितही पाहायला मिळत आहेत. आपल्या लाडक्या मैत्रिणीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाच्या क्षणी तिला शुभेच्छा देण्यासाठी दोघे आवर्जून हजर आहेत. यानंतर २७ डिसेंबर २०१४ रोजी श्रेया रेशीमगाठीत अडकली. निखील सेठसह श्रेयाचं शुभमंगल पार पडलं. सध्या आपल्या संसारात श्रेया खुश असून चला हवा येऊ द्या या शोच्या माध्यमातून करिअरमध्येही यशाची नवी उंची गाठली आहे. अगदी कमी वयात अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणा-या श्रेयानं नाटक, टीव्ही या माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तू तिथे मी, अस्मिता, फू बाई फू अशा मालिकांमधून श्रेयाने मराठी रसिकांवर जादू केली आहे. मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेतही नाटकं सादर केली आहेत.