सिनेइंडस्ट्रीत कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कोणाला दिसण्यावरून नाकारलं जातं तर कोणाला भाषेवरून. नुकतेच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने ती विदर्भातली असल्यामुळे तिला बऱ्याचदा नकाराला सामारे जावे लागत असल्याचं सांगितलं. ही अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता उत्तरवार (Amruta Uttarwar). तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत शुद्ध मराठी बोलणाऱ्यांना आणि पुणेकरांना भाषेवरून सवाल केला आहे.
अभिनेत्री अमृता उत्तरवार हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने म्हटले की, ''समस्त विदर्भीयांची ही व्यथा आहे. बऱ्याचदा विदर्भाच्या कलाकारांना रिजेक्ट केलं जातं. माझा वैयक्तिक अनुभव आहे की, मी ऑडिशन देते पण त्यातील काही वेळेला मला रिजेक्शन दिलं जातं. का? तर ते म्हणतात की, तुझा 'ळ' आणि 'न, ण'चा प्रॉब्लेम आहे. नक्कीच, मी याच्यावर काम केलंय पण बऱ्याचदा भावनेच्या भरात ते ळ आणि न होतं त्याबद्दल मी मान्य करते.''
ती पुढे म्हणाली की, ''जर आमचा हा प्रॉब्लेम आहे, आम्हाला स्वीकारलं जात नाही तर मला जे शुद्ध मराठी बोलतात किंवा जे पुणेकर आहेत त्यांना विचारायचंय की, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं मराठी भाषेचं हसणार, बसणार, बोलणार वगैरे. पण आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं??? म्हणजे तुम्ही 'स' चा अक्षरशः 'श' करताय ते तुम्हाला चालतं. आम्ही 'न' चा 'ण' केलेला तुम्हाला चालत नाही...लिहिताना असणार असंच लिहिणार पण बोलताना हशणार कुठून आलं?. मी मुद्दामहून असं बोलत नाही मी त्यावर अभ्यास केलाय. मी जिथे जिथे शूटला गेले तिथे जे उत्तम मराठी बोलणारे कलाकार आहेत. त्यांनासुद्धा मी विचारलं, पण सगळेजण म्हणाले की, 'नाही गं असा काही रूल नाही, पण आता असंच सगळे बोलतात तर तो ट्रेंड झालाय'. मग तुमचा ट्रेंड तो ट्रेंड आणि आमचा ट्रेंड ती चूक??? वा!!!''
वर्कफ्रंट
अभिनेत्री अमृता उत्तरवार ही विदर्भातली आहे. तिने बाळू मामाच्या नावानं चांगभलं, वृद्धाश्रम शॉर्ट फिल्म, महानायक, प्रेमा तुझा रंग कसा, घेतला वसा टाकू नको अशा प्रोजेक्टमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत.