इस प्यार को क्या नाम दूँ 3 या मालिकेच्या सेटवर दिसणार छोटे बाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 12:29 IST
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या मालिकेतील बरुण सोबती आणि सान्या ...
इस प्यार को क्या नाम दूँ 3 या मालिकेच्या सेटवर दिसणार छोटे बाळ
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या मालिकेतील बरुण सोबती आणि सान्या इराणी यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेचा सिझन प्रेक्षकांना आवडल्यामुळे या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. पण या दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या सिझनमध्ये शरेणू पारेख आणि अविनाश सचदेव यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. दुसऱ्या सिझनमध्ये बरुण आणि सान्या नसल्याने प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. हे पाहाता आता वरुणला या मालिकेच्या तिसऱ्या सिझमध्ये परत आणण्यात आले आहे. तो या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार असून शिवानी तोमर या मालिकेत त्याच्यासोबत झळकणार आहे.या मालिकेत मिताली नाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिताली या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. मितालीने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यामुळे मिताली छोट्या पडद्यापासून दूर होती. पण आता ती इस प्यार को क्या नाम दूँ 3 या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती अद्वयसिंह रायजादाच्या आईची भूमिका साकारणार आहे. छोट्या पडद्यावर परतण्यासाठी ती खूप उत्सुक आहे आणि विशेष म्हणजे तिचे बाळ काहीच महिन्याचे असल्यामुळे ती तिच्या छोट्याशा बाळालादेखील मालिकेच्या सेटवर घेऊन जाणार आहे. याविषयी मिताली सांगते, मी प्रसुतीच्या आठव्या महिन्यापर्यंत छोट्या पडद्यावर काम केले होते आणि आता माझे बाळ थोडेसे मोठे झाल्याने मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत मी एका आईची भूमिका साकारणार आहे आणि आता खऱ्या आयुष्यातही मी आई असल्याने आईच्या भावना काय असतात हे जाणून घेणे मला सोपे झाले आहे. या मालिकेत आईची भूमिका साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझे बाळ छोटे असल्याने मी त्याला सेटवर घेऊन जाणार आहे. छोट्या पडद्यावर परतण्यासाठी माझ्या नवऱ्याने मला प्रचंड पाठिंबा दिला.