तस्नीम शेख डिझाइन करतेय एक विवाह ऐसा भी या मालिकेसाठी साड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 16:44 IST
तस्नीम शेखने क्योंकी साँस भी कभी बहू थी, कुसुम यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. पण लग्न झाल्यानंतर संसार, ...
तस्नीम शेख डिझाइन करतेय एक विवाह ऐसा भी या मालिकेसाठी साड्या
तस्नीम शेखने क्योंकी साँस भी कभी बहू थी, कुसुम यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. पण लग्न झाल्यानंतर संसार, मूल यांच्यात ती व्यग्र असल्याने ती छोट्या पडद्यापासून दूर राहिली. ती एक विवाह ऐसा भी या मालिकेद्वारे नऊ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी सध्या ती स्वतः प्रयत्न करत आहे. या मालिकेतील तिच्या लूकवर ती मेहनत घेत आहे. याविषयी तस्नीम सांगते, "केवळ संवाद म्हणणे म्हणजे अभिनय करणे असे मी मानत नाही, तुमच्या संपूर्ण व्यक्तिरेखेबाबत प्रत्येक गोष्टी तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. त्यामुळे तुमची वागणूक, देहबोलीप्रमाणेच तुमची वेशभूषादेखील तुमच्या व्यक्तिरेखेसाठी खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळेच एक विवाह ऐसा भी या मालिकेतील मी घालत असलेल्या साड्यांची मी स्वतः निवड करत आहे. छोट्या पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री या नेहमी भरजरीच्या साड्या आणि खूप सारा मेकअप, दागिने या वेशात प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळे मी साकारत असलेल्या सिंदूरा या व्यक्तिरेखेचा लूक त्याप्रकारे नसावा यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी साकारत असलेली सिंदूरा मित्तल ही अतिशय सॉफिस्टिकेटेड स्त्री आहे. ती तिच्या स्टेटसचा नेहमी विचार करते. त्यामुळे तिच्या या गोष्टींना साजेसा असा माझा लूक असला पाहिजे असे माझे मत होते. त्यामुळे मी या मालिकेच्या कॉस्च्युयम डिझायनरसोबत बसून माझ्या व्यक्तिरेखेचा लूक कसा असला पाहिजे याबाबत चर्चा करते. तसेच मला स्वतःला प्रिंटच्या साड्या आवडत नाहीत. त्यामुळे मी अतिशय साध्या साड्या या मालिकेत घालणार आहे. तसेच ज्वेलरीदेखील अतिशय साधी पण क्लासी वापरणार आहे."