Join us

'सखा माझा पांडुरंग'मधील सखुला भेटण्यासाठी कराडचे ग्रामस्थ पोहोचले सेटवर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 17:41 IST

Sakha Maza Pandurang Serial : 'सखा माझा पांडुरंग' ही मालिका महिला संत सखुबाई यांच्या थोर जीवनावर आधारित आहे. या मालिकेद्वारे संत सखुबाईंचं प्रेरणादायी जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर उलगडत आहे.

'सखा माझा पांडुरंग' ही मालिका महिला संत सखुबाई यांच्या थोर जीवनावर आधारित आहे. या मालिकेद्वारे संत सखुबाईंचं प्रेरणादायी जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर उलगडत आहे. विठ्ठलाच्या निस्सीम भक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखुबाईंचं नाव महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतांमध्ये आदराने घेतलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रात महिला संत सखूबाईंचं एकमेव मंदिर हे कराड येथे आहे. संत सखुबाई या कराड मधल्या असल्याने तेथील ग्रामस्थ मालिका आवर्जून पाहतात. 

'सखा माझा पांडुरंग' मालिकेत सखुबाई यांच्या बालपणीची भूमिका स्वराली खोमणे साकारत असून, तिच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून दाद मिळत आहे. वयाच्या १० व्या वर्षी स्वरालीने तिच्या अभिनयाने साऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. स्वरालीचं कौतुक करण्यासाठी  संत सखुबाई मंदिर आणि विठ्ठलदेव व त्र्यंबक देव ट्रस्ट, कराड येथून संजीव सराटे, शार्दुल चरेगावकर आणि सुरेंद्र काळे हे मान्यवर थेट मालिकेच्या सेटवर पोहोचले. योगायोग म्हणजे त्याच दिवशी स्वरालीचा वाढदिवस असल्याने सेटवर केक कटिंग करत जोरदार सेलिब्रेशन पार पडलं. 

''आमच्या गावासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट''

संजीव सराटे आणि शार्दुल चरेगावकर म्हणाले, ''संत सखुबाई या अशा संत आहेत ज्यांना प्रत्यक्ष विठुरायाचा सहवास लाभला. त्यांच्यावर आधारित मालिका आजच्या काळात येणं गरजेचं होतं आणि 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेमुळे हे शक्य होतं आहे. आमच्या गावासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मालिका खूप सुंदर पद्धतीने सुरु आहे. त्यात स्वराली ही बालकलाकार म्हणून तिचं काम उत्तमरित्या पार पडत आहे. त्यामुळेच आज आम्ही कराडवरून मुंबईमध्ये आलो आहोत. खरंच सन मराठी वाहिनीचे आणि मालिकेत मेहनत घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. मालिकेच्या माध्यमातून सखूबाईंची कथा त्यांचा प्रवास घराघरात पोहोचला पाहिजे.''