अभिनेता वैभव मांगले(Vaibhav Mangle)ने नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज या माध्यमांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता बऱ्याच कालावधीनंतर वैभव मांगले छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. तो स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होणाऱ्या नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू, काय झालीस तू!. या मालिकेत तो अभिनेत्री गिरीजा प्रभूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
कोण होतीस तू, काय झालीस तू! या नव्याकोऱ्या मालिकेतून गिरीजा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.या मालिकेत तिच्या वडिलांच्या भूमिकेत वैभव मांगले दिसणार आहे. बाप-लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
या मालिकेबद्दल गिरीजा म्हणाली की, पुन्हा एकदा नवं पात्र साकारायची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार. कावेरी ही भूमिका खूप वेगळी आहे. मालिकेची गोष्ट मालवणात घडते त्यामुळे मालवणी भाषा शिकतेय. मालिकेच्या प्रोमोमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळेलच. मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मी मालवणी भाषेचे धडे गिरवत आहे. कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी झटत असते.