'पवित्र रिश्ता' मधली खाष्ट सासू म्हणून ओळख मिळवलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) त्यांच्या सडेतोड स्वभावामुळे ओळखल्या जातात. त्यांची स्टाईलच वेगळी आहे. बोलायला सडेतोड असल्या तरी तितक्याच त्या भावनिकही आहेत. काही दिवसांपूर्वी त्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये दिसल्या. इथे त्यांनी अनेक पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश बनवल्या. नुकतंच त्यांनी फराह खानवर खोचक टिप्पणी केली.
फराह खानचं युट्यूबवर चॅनल आहे. यामध्ये ती तिचा शेफ दिलीपसह सेलिब्रिटींच्या घरी जाते आणि त्यांनी बनवलेल्या स्पेशल जेवणाचा आस्वाद घेते. नुकतंच 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णींना फराह खानसोबत तुमचं नातं कसं आहे? त्यांनी बनवलेलं जेवणही लोकांना खूप आवडतं. यावर उषा नाडकर्णी म्हणाल्या, "ती कुठे काय बनवते? लोकांच्या घरी जाते आणि लोक स्वयंपाक करतात. दिलीत मदत करतो. फराह काहीच करत नाही. तिचं फक्त एकच आहे चिकन... लोखंडवालाचं चिकन..."
उषा नाडकर्णी सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये सर्वात सीनिअर कंटेस्टंट होत्या. 'पिंकव्हिला'च्या या मुलाखतीत त्यांनी चाहत्यांना आपलं घर दाखवलं. १ बीएचके घरात त्या एकट्याच राहतात. हे सांगताना त्या आईवडिलांच्या आठवणीत भावुकही झाल्या. उषाताईंना एक मुलगा आहे जो परदेशात स्थायिक आहे.