Join us

"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 10:40 IST

अभिनयासोबतच उषा नाडकर्णी त्यांच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखल्या जातात. इतके वर्ष काम करूनही त्यांना गलीबॉय सिनेमाच्या ऑडिशन देण्यासाठी सांगण्यात आलं त्यामुळे त्या भडकल्या होत्या. 

उषा नाडकर्णी या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. अनेक विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या उषा नाडकर्णींना चाहत्यांनी खाष्ट सासू म्हणून पाहणं जास्त पसंत केलं. अभिनयासोबतच उषा नाडकर्णी त्यांच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखल्या जातात. इतके वर्ष काम करूनही त्यांना गलीबॉय सिनेमाच्या ऑडिशन देण्यासाठी सांगण्यात आलं त्यामुळे त्या भडकल्या होत्या. 

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी याबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, "आता ऑडिशनचं फॅड निघालंय. तुम्ही ऑडिशन घ्या पण विचार करून घ्या. कोणत्या प्रोडक्शनचं मला नाव घ्यायचं नाही. परवा मला एक फोन आला होता. एका भूमिकेची ऑफर होती आणि मला म्हणाला आमच्या ऑफिसमध्ये ऑडिशन द्यायला या. मी त्याला विचारलं ७८ वर्षांत मी काय केलं? की तू मला आता ऑडिशन द्यायला सांगत आहेस. असंच गलीबॉय सिनेमाच्या वेळीही झालं होतं". 

"गली बॉयच्या वेळी एका मुलाचा फोन आला होता. मला म्हणाला ऑडिशन देण्यासाठी या. मी त्याला विचारलं की तुझं वय काय आहे? तो म्हणाला २५ वर्ष...मी त्याला म्हणाले की तुझ्या आईचं लग्न झालेलं नसेल तेव्हापासून मी काम करतेय. मी असं ऑडिशन द्यायचं फालतू काम करत नाही. मी त्याला विचारलं तुमचा दिग्दर्शक कोण आहे? त्याने नाव सांगितलं(झोया अख्तर). मी म्हटलं हो ती बड्या बापाची मुलगी आहे. इंटरनेटवर माझं नाव टाकून सर्च कर. मग कळेल मी किती काम केलंय. मी ऑडिशनवगैरे देत नाही. हवं असेल तर सिनेमात घ्या. रुस्तमच्या वेळी मला बोलवलं. ऑफिसमध्ये एका माणसाने मला काय करायचं सांगितलं. त्यांनी मला ऑडिशन द्यायला सांगितलं नाही. मी छोटी भूमिका केली पण त्याचे पैसे मिळाले", असंही त्या म्हणाल्या. 

उषाताईंनी पुढे आणखी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, "आजकालची मुलं आली आहेत असिस्टंट दिग्दर्शक बनून. येत काहीच नाही पण मला ऑडिशन द्यायला सांगतात. कविता चौधरीच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. तिथे मुलं बसली होती. त्यातल्या एकानेही मला बसायलाही सांगितलं नाही. ज्या भूमिकेसाठी तुम्ही आलात ती आता नाही असं ते म्हणाले. त्याने मला पुस्तक दिलं आणि मला बोलले हे वाचून दाखवा. मी त्याला म्हटलं हे मी तुला वाचून दाखवू. मी ते पुस्तक घेतलं आणि त्याच्या समोर असं फेकून दिलं. माझं डोकं फिरलं. फालतू मुलं मला बोलणार का वाचून दाखव म्हणून. अशी फालतूगिरी मी सहन नाही करत".

टॅग्स :उषा नाडकर्णीटिव्ही कलाकार