Join us

​उदित नारायण आणि अलका याज्ञिक दिसणार सारेगमापा लिटल चॅप्समध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 13:13 IST

सारेगमापा लिटिल चॅम्पसमधील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज खूपच छान आहेत. या कार्यक्रमात दर आठवड्याला काही सेलिब्रेटी परीक्षक म्हणून हजेरी लावत ...

सारेगमापा लिटिल चॅम्पसमधील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज खूपच छान आहेत. या कार्यक्रमात दर आठवड्याला काही सेलिब्रेटी परीक्षक म्हणून हजेरी लावत असतात आणि या कार्यक्रमातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगले गाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. या आठवड्यात आता उदित नारायण आणि अलका याज्ञिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अलका आणि उदितच्या जोडीने आतापर्यंत अनेक हिट गाणी इंडस्ट्रीला दिली आहेत. एकेकाळी यांच्या जोडीची गाणी म्हटली की ती हिट होणारच असेच म्हटले जात असे. अलका आणि उदितने सारेगमापा लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे या भागात सगळी नव्वदीच्या दशकातील गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. स्पर्धक अलका आणि उदितची गाणी सादर करणार असून त्या काळाला उजाळा देणार आहेत. या कार्यक्रमाच्या सेटवर अलका आणि उदित येताच उदित यांनी शायरीच्या माध्यमातून अलकाच्या आवाजाची स्तुती केली. यामुळे अलका प्रचंड खूश झाली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करतो. आदित्य हा उदित नारायण यांचा मुलगा असल्याने त्याला या भागाचे चित्रीकरण करायला खूपच मजा आली होती. त्याने आपल्या वडिलांसोबत अनेक मजेदार गप्पा मारल्या. तसेच आदित्य त्याच्या वडिलांनाच गुरू मानतो. त्यांच्याकडूनच त्याने गाण्याचे धडे गिरवले असल्याचे त्याने सगळ्यांना सांगितले. आदित्यला लहानपणापासून त्याच्या वडिलांची नक्कल करायला आवडते. त्याने या कार्यक्रमातदेखील वडिलांसारखी मिशी लावून त्यांची नक्कल केली. ही नक्कल पाहून उपस्थितांना त्यांचे हसू आवरत नव्हते. सारेगमापा लिटिल चॅम्पसच्या सगळ्या स्पर्धकांचे अलका आणि उदितने कौतुक केले. तसेच त्यांना गायनासाठी काही टिप्सदेखील दिल्या. या कार्यक्रमातील परीक्षक नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अलीदेखील अलका आणि उदितच्या येण्याने प्रचंड खूश झाले होते.