टीव्ही मालिका, वेबसीरिजमध्ये झळकणारा अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeer Choudhary) १७ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. टीव्हीवरील 'रामायण' मालिकेत त्याने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली होती. २००८ मध्ये ही मालिका आली होती. यामध्ये अभिनेत्री देबिना बॅनर्जीने (Debina Bonnerjee) सीतामातेची भूमिका साकारली. नंतर गुरमीत आणि देबिना खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले. नुकतंच गुरमित आणि देबिना आपल्या दोन्ही मुलींसह वृंदानवनात पोहोचले. त्यांनी तिथे प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वृंदावनातील प्रसिद्ध धर्मगुरु प्रेमानंद महाराज यांची लोकप्रियता अफाट आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मानेही अनेकदा त्यांचं दर्शन घेतलं आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटीही वृंदावनात गेले आहेत. आता नुकतंच अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिनाही वृंदावनात पोहोचले. प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात ते गेले. यावेळी गुरमित महाराजांचा आशीर्वाद घेत त्यांना म्हणाला, "मी आणि माझ्या पत्नीने केलेली सर्वात पहिली भूमिका ही श्रीराम आणि सीतेची होती. देशभरातून आम्हाला खूप प्रेम मिळालं. बस, आम्हाला आशीर्वाद द्या."
तेव्हा प्रेमानंद महाराज म्हणाले, "देवाचं नाव घेत राहा, नामस्मरण करत राहा. पुढे अजून प्रगतीच्या संधी आहेत. देवाच्या नामस्मरणात खूप सामर्थ्य आहे. तुम्हाला देवाचीच भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे हे तुमचं सौभाग्यच आहे. सियाराम सियाराम म्हणत राहा. अशुभ गोष्टींना नष्ट करण्यासाठी नामस्मरण करण्याची गरज आहे."
देबिना आणि गुरमीत सध्या 'पती-पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये दिसत आहेत. देबिना बऱ्याच वर्षांपासून टीव्हीवरुन दूर होती. मात्र आता तिने कमबॅक केलं आहे. त्यांना दोन छोट्या मुली आहेत. पहिल्या लेकीच्या जन्मानंतर सहा महिन्यातच देबिनाने दुसऱ्या लेकीला जन्म दिला होता. सध्या ती त्यांच्या पालनपोषणात व्यग्र आहे.