पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या तीन अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि त्या तिघांच्या खूप जवळची होती. पाकिस्तान दूतावासात काम करणाऱ्या दानिशने ज्योतीची या अधिकाऱ्यांशी ओळख करून दिल्याचे उघड झाले आहे. ज्योतीने संवेदनशील माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उघडकीस आल्यानंतर टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली हिने संताप व्यक्त केला आहे.
रुपालीने तिच्या एक्स अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. रुपालीने ज्योतीचा फोटो शेअर केला आहे. "अशा लोकांना कळतही नाही की त्यांचं पाकिस्तानबद्दल असलेलं प्रेम केव्हा भारतासाठी द्वेषात रुपांतरित होतं. सुरुवातीला ते अमन की आशाच्या गोष्टी करतात. पण, नंतर भारताचा द्वेष करतात. माहीत नाही असे किती लोग आहेत जे गुप्त राहून देशाविरोधात काम करत आहेत. कोणीही सुटलं नाही पाहिजे", असं रुपालीने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कोण आहे युट्यूबर ज्योती मल्होत्रा?युट्यूबर ज्योती ही हरियाणा पॉवर डिस्कमच्या निवृत्त अधिकाऱ्याची मुलगी आहे. ती पदवीधर असून, तिचे YouTubeवर 3.21 लाख फॉलोअर्स आहेत. तिने पाकिस्तान दौऱ्याचे व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केले आहेत. पाकिस्ताच्या दौऱ्यादरम्यान ज्योतीची पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशशी ओळख झाली. दानिशला हेरगिरीच्या आरोपाखाली 13 मे रोजी देशातून हाकलून लावण्यात आले होते. तो व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवत असे.
ज्योती दानिशच्या संपर्कात कशी आली?2023 मध्ये जेव्हा ज्योतीला पाकिस्तानला जायचे होते, तेव्हा ती व्हिसा मिळविण्यासाठी पाकिस्तानी दूतावासात गेली. याच काळात तिची भेट दानिशशी भेट झाली. यानंतर ती दानिशला अनेक वेळा भेटल्याचा आरोप आहे. ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्याही संपर्कात होती. पाकिस्तानात पोहोचल्यावर दानिशच्या ओळखीचा अली अहवान याने ज्योतीला मदत केली. या पोलिस ज्योतीची चौकशी करत आहेत.