Hardik Joshi: अभिनेता हार्दीक जोशी (Hardik Joshi) मराठी सिनेइंडस्ट्रीतला लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'तुझ्यात जीव रंगला'ला मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली 'राणादा'ची भूमिका लोकप्रिय ठरली. त्यानंतर त्याने बऱ्याच मालिकेत काम केलं. हार्दिक जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल तो अनेकदा चाहत्यांना माहिती देत असतो. अशातच, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हार्दिकने त्याच्या आयुष्यातील एका अत्यंत भयावह अपघाताचा प्रसंग सांगितला.
हार्दिक जोशीचा २००५ मध्ये एक मोठा अपघात झाला होता, ज्यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. 'कविरत स्टुडिओ'ला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक म्हणाला, "मी बाईकवरून कॉलेजला जात असताना रस्त्यात पडलो. पडल्यानंतर मी लगेच बाईक सोडून दिली. तेवढ्यात मागून एक बस येत होती. तिचा वेग स्लो झाला, ती पकडून मागे गेलो. चाक हे बसच्या मडगार्ड मागे असतं ते चाक दुर्दैवाने माझ्या पायावरून गेलं".
हार्दिकने पुढे सांगितलं, "त्यानंतर मी पुढे जाऊन फुटपाथवर बसलो. तेव्हा पहिलं तर हाडाला मार लागला होता. मोठ्या चाकांत काही छोटे दगड अडकलेले असतात, त्यापैकी एकही दगड त्या हाडाला लागला असता तर ते हाड राहिलंच नसतं. यामध्ये काहीही होऊ शकलं असतं. तेव्हा अनेक विचार आले".
आई आणि भावाने दिला धीर
हार्दिक म्हणाला, "तेव्हा मी लहान होतो, डोक्यात अनेक विचार येत होते, की या अपघातानंतर, मी लंगडा होणार, मला चालता येणार नाही. या कठीण काळात आईने आणि भावाने मोठा आधार दिला. या अपघातात झालेल्या जखमेवर नंतर तीन वर्षांनी नवीन त्वचा आली. ती त्वचा येतानासुद्धा मी पाहिली आहे".