Join us

Amruta Pawar Wedding : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...! पाहा, अमृता पवारच्या लग्नाचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 10:30 IST

Marathi Actress Amruta Pawar Wedding : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार काल लग्नबेडीत अडकली.

 ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’  (Tuzya Mazya Sansarala Ani Kay Hav) मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अमृता पवार ( Amruta Pawar ) हिचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला होता.  काल 6 जुलैला अमृता पवारचा शाही लग्नसोहळा पार पडला. नील पाटीलसोबत अमृताने लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

अमृता पवारने लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. हातात हिरवा चुळा, डोक्याला बाशिंग अशी अमृता नववधूच्या पोशाखात कमालीची सुंदर दिसत होती. नील सुद्धा राजबिंडा दिसत होता. अग्नीच्या साक्षीने अमृता व नील यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या.

अमृता व नीलच्या लग्नात टीव्हीच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याआधी अमृताच्या मेहंदी आणि हळदीचे फोटो व्हायरल झाले होते. हळदीसाठी अमृताने गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर फुलांचे दागिणे घातले होते. सर्वाधिक खास होते ते तिचे कानातले. या कानातल्यावर दुल्हनिया असं लिहिलेलं होतं. 

 गेल्या 4 एप्रिल रोजी अमृता व नीलचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता.   तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अमृताचा पती नील पाटील याचा कलाविश्वाशी काहीही संबंध नसून तो इंजिनिअर आहे.    ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत आई बाबा आणि आईची लाडकी लेक अशा त्रिकोणी कुटुंबातून ५० जणांच्या कुटुंबात लग्न होऊन आलेल्या अदितीची भूमिका अमृता साकारते आहे.

सध्या एकत्र कुटुंब पद्धती हरवत चालली असताना ती टिकवून कशी ठेवता येईल हा संदेश घेऊन आलेली ही मालिका आदिती आणि सिद्धार्थ यांच्या वेगवेगळ्या कौटुंबिक विश्वावर आधारित आहे. या मालिकेत अमृताने आदितीची भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेव्यतिरिक्त अमृताने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.    अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘दुहेरी’ या मराठी मालिकेतून केली.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार