झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Aamcha Dada Serial ) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत सूर्या आणि तुळजाने रसिकांच्या मनात घर केले आहे. लाखात एक आमचा दादा ही मालिका निरोप घेण्याच्या चर्चा सुरू असतानाच यामध्ये तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर हिने शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मृण्मयी गोंधळेकरने लाखात एक आमचा दादा मालिकेतील तिचे फोटो शेअर करत लिहिले की, ''मृण्मयी आणि तुळजाची पडली गाठ, दोघींमध्ये झाली मैत्री दाट. मृण्मयी जशी शांत,सौम्य, सोज्ज्वळ, तुळजा तशी बोल्ड, बिंदास पण तेवढीच प्रांजळ. वज्र प्रोडक्शनमध्ये तुळजा मृण्मयीचा झाला उगम, तेव्हाच एका नायिकेचा, तिच्या पात्राशी झाला संगम. मृण्मयी तुळजाने धरून हातात हात, केला लाखात एक मालिकेचा यशस्वी प्रवास. मृण्मयीने व्यक्तीरेखेतून तुळजाला दाखवलं, तुळजाने, हाडाची कलाकार म्हणून मृण्मयीला घडवलं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला तुळजाने शिकवलं मृण्मयीने तुळजाकडून असं बरंच काही मिळवलं.''
तिने पुढे लिहिले की, ''मृण्मयीला गवसली तुळजासारखी लाखात एक गुरु, तिच्याच साथीने चालू राहील मृण्मयीचा यशस्वी प्रवास सुरू. वज्र प्रोडक्शन चा मिळाला लाख मोलाचा हातभार, त्यासाठी मृण्मयी व तुळजा कडून त्यांचे लाख लाख आभार. मनापासून धन्यवाद झी मराठी, वज्र प्रोडक्शन आणि लाखात एक आमचा दादा मालिका. '' मृण्मयीची ही पोस्ट पाहून ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे.