Join us
Daily Top 2Weekly Top 5

Tula Pahate Re मालिकेने रचला हा रेकॉर्ड, टॉप शोच्या यादीत मिळाले पहिल्या क्रमांकाचे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 12:15 IST

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. यात  'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपांतर होतं हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. नुकतंच या मालिकेने टि.आर.पी.चा उच्चांक गाठून टॉप शोजच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले. मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून हा आनंद साजरा केला.

जरी मालिका सुरु होऊन थोडाच अवधी झाला असला तरी 'तुला पाहते रे' ची वेगळी आणि रंजक कथा व सुबोध भावेचे छोट्या पडद्यावरील पुनरागमन आणि त्याचं मन मोहून टाकणारं अभिनय कौशल्य या सर्व गोष्टींमुळे मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. 

नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की इशाचं लग्न बिपीनसोबत ठरलेलं असून विक्रांत तिच्या लग्नात तिच्या घरच्यांना मदत करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा प्रसंग अगदी 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील सिमरनच्या लग्नात मदतीला आलेल्या राजच्या प्रसंगाशी मिळता-जुळता आहे. विक्रांतच्या येण्यामुळे मालिकेने आता वेगळीच कलाटणी घेतली आहे. ईशा आणि बिपीनचं लग्न सुरळीत पार पडणार का? विक्रांत ईशाला विसरू शकेल का? विक्रांत आणि ईशा एकत्र येतील का? हे प्रेक्षकांना येत्या काही भागात पाहायला मिळेल.

 

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे