आषाढी एकादशी पंढरपूर वारीची महाराष्ट्रात परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. देहू , आळंदी येथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पालखीतून पंढरपुरात दाखल होतात. हा संपूर्ण प्रवास वारकरी पायी चालत करतात. वारीचा संपूर्ण सोहळा हा नयनरम्य असतो. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी वारीमध्ये सहभागी होताना दिसतात. यंदाही अनेक सेलिब्रिटी वारीमध्ये सहभागी होत आनंद घेत आहेत.
स्टार प्रवाहच्या माध्यमातून आदेश बांदेकर वारीनिमित्त 'माऊली महाराष्ट्राची-पंढरीची वारी, तुमच्या घरी' हा खास कार्यक्रम घेऊन आले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तु ही रे माझा मितवामधील ईश्वरी आणि अर्णव म्हणजे शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांनीही वारीत सहभाग घेतला. यावेळी अभिजीतने वारकऱ्यांसह हरिनामाचा गरज केला. तर शर्वरीने वारकऱ्यांची सेवा केल्याचं पाहायला मिळालं. वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत शर्वरीने तव्यावर भाकऱ्या भाजल्या.
शर्वरीचा हा वारीतील व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर पंढरीच्या वारीचा हा विशेष कार्यक्रम दररोज संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आदेश बांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत.