Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तू चाल पुढं' मालिकेतील अभिनेत्याचा झाला साखरपुडा, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 11:59 IST

'तू चाल पुढंं' मालिकेतील अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सिनेइंडस्ट्रीमध्ये सध्या एंगेजमेंट आणि विवाह सोहळ्याचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा दिल्ली येथे साखरपुडा पार पडला. त्यांच्या या सोहळ्याची सर्वत्र चर्चा होते आहे. दरम्यान तू चाल पुढंं मालिकेतील अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा अभिनेता म्हणजे तू चाल पुढं मालिकेतील शिल्पीचा मित्र म्हणजेच अभिनेता ध्रुव दातार(Dhruv Datar).

अभिनेता ध्रुव दातारने १४ मे रोजी कोरिओग्राफर असलेल्या अक्षता तिखे सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केलेला आहे. ध्रुव आणि अक्षताच्या साखरपुड्याला त्यांच्या जवळच्या काही मोजक्याच मित्रमंडळींनी आणि नातेवाईकांनी हजेरी लावली होती. ध्रुवने तू चाल पुढं या मालिकेत विरोधी भूमिका साकारलेली पाहायला मिळते. अभिनय क्षेत्रात येण्यागोदर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले होते. शिक्षण झाल्यानंतर त्याने आपले पाऊल मॉडेलिंग क्षेत्राकडे वळवले.

विविध नामांकित ब्रॅण्डसाठी त्याने मॉडेलिंग केले आहे. मॉडेलिंग करतानाच अभिनय क्षेत्रात देखील काम करण्याची त्याची ईच्छा होती. मात्र म्हणावी तशी त्याला संधी मिळत नव्हती. याचदरम्यान अभिनेता दिग्दर्शिक असलेल्या सुजीत देशपांडेसोबत त्याची ओळख झाली. संजय पवार लिखित ‘मान्यतेच्या झग्याखाली’ या नाटकातून ध्रुवला प्रथम अभिनयाची संधी मिळाली होती. अभिनयाचा कुठलाही अनुभव नसताना दिग्दर्शक सुजित देशपांडे याने ध्रुवला ही मोठी संधी मिळवून दिली. या नाटकाचे बरेचसे प्रयोग झाले, त्यामुळे रंगभूमीवर ध्रुव बिनधास्तपणे वावरताना दिसला. स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत ध्रुवने दिलावर खानची भूमिका साकारली होती. ओमी वैद्य, स्नेहा देशमुख यांच्या आगामी मराठी चित्रपटातून ध्रुव मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.