संकर्षण कऱ्हाडे देवा शप्पथ या मालिकेत दिसणार एका वेगळ्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 14:45 IST
देव ही निरंकारी गोष्ट आहे असे एक मत आहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी ...
संकर्षण कऱ्हाडे देवा शप्पथ या मालिकेत दिसणार एका वेगळ्या भूमिकेत
देव ही निरंकारी गोष्ट आहे असे एक मत आहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे. आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडायच्या झाल्या तर देव आणि माणसाची भेट कशी होईल? या भन्नाट फँटसीवर बेतलेली देवा शप्पथ ही मालिका झी युवावर लवकरच सुरू होणार आहे. साधारणतः देव म्हटलं की भक्ती आणि चमत्कार या विषयी दाखवले जाते. पण देवा शप्पथ या मालिकेत या पारंपरिक विचारांना छेद देत एक उत्तम कथा पाहायला मिळणार आहे. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वी तलावर येणार आहे. पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही. आपण देवावर किती प्रेम करतो यापेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा न करता काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपात मानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहे, हे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झी युवा वाहिनी करत आहे. या मालिकेत देव म्हणजेच खट्याळ कृष्ण ऊर्फ आजचा क्रिश दाखवला जाणार आहे.देवा शप्पथ या खट्याळ कृष्ण ऊर्फ क्रिशच्या भूमिकेत क्षितिश दातेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर त्याच्या नास्तिक भक्ताची म्हणजेच श्लोकची भूमिका संकर्षण कऱ्हाडे साकारणार आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे, शाल्मली टोळ्ये, अभिषेक कुलकर्णी, कौमुदी वालोकर, चैत्राली गुप्ते, आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत.क्षितिश दाते अनेक वर्षं रंगभूमीवर काम करत आहे. आता या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे तर संकर्षण कऱ्हाडेने आजवर मला सासू हवी, खुलता कळी खुलेना यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. संकर्षण आणि क्षितिशच्या जोडीची देवा शप्पथ ही मालिका प्रेक्षकांनाही आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.