Join us

'कमळी' मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक, केतकी कुलकर्णी म्हणाली - "मी कबड्डीत प्रो नाही, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:46 IST

Kamali Serial : 'कमळी'मध्ये लवकरच प्रेक्षकांना एक नवीन आणि रोमांचक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. या ट्रॅकमध्ये कबड्डीची चुरस लागणार असून टीम कमळी आणि टीम अनिका आमनेसामने येणार आहेत.

लोकप्रिय मालिका 'कमळी'(Kamali Serial)मध्ये लवकरच प्रेक्षकांना एक नवीन आणि रोमांचक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. या ट्रॅकमध्ये कबड्डीची चुरस लागणार असून टीम कमळी आणि टीम अनिका आमनेसामने येणार आहेत. या अनोख्या ट्रॅकमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या विशेष ट्रॅकसाठी अभिनेत्री केतकी कुलकर्णी म्हणजेच अनिका स्वतः कबड्डीच्या सरावात गुंतली आहे. 

केतकी म्हणाली, "तयारी जोरात सुरू आहे. आम्ही जवळपास दररोज प्रॅक्टिस करत आहोत. मी याआधी फारशी कबड्डी खेळलेली नाही, पण आता सराव करत आहे आणि बऱ्याच गोष्टी शिकत आहे. मी कबड्डीचे नियम शिकले असून प्रोफेशनल गेमचे व्हिडिओज पाहून अनेक गोष्टी समजून घेते आहे. कुठलाही खेळ असो, स्टॅमिना फार महत्त्वाचा असतो आणि मी त्यावरही काम करत आहे. वॉर्म अप, वर्कआउट्स, जॉगिंग करते. डाएटचीही काळजी घेते, फक्त या गेमसाठी नाही तर रोजच. मी जंक फूड आणि साखर टाळते."

"सध्या पावसाळा आहे, पण उन्हात खेळताना मी नेहमी स्वतःला हायड्रेट ठेवते, लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रोलाइट घेत राहते," असंही तिने सांगितलं. मालिकेतील हा कबड्डी स्पर्धेचा ट्रॅक निश्चितच प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. टीम कमळी आणि टीम अनिका यांच्यातील ह्या रंगतदार सामन्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढली असून लवकरच हा ट्रॅक प्रेक्षकांना पहाता येणार आहे.