Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:22 IST

येत्या १६ जानेवारी पासून शुभविवाह ही नवीन मालिका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर नवनवीन मालिका दाखल होत आहेत. आता प्रेक्षकांना दुपारी देखील नवीन मालिकांचा आस्वाद घेता येणार आहे. येत्या १६ जानेवारी पासून शुभविवाह ही नवीन मालिका सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अभिनेत्री मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. 

इथेच टाका तंबू या मालिकेनंतर जवळपास चार वर्षानंतर मधुरा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर यशोमन आपटे हा नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार या मालिकेतून पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कुंजीका काळवींट आणि अभिजित श्वेतचंद्र हे विरोधी भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेच्या येण्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. 

मुलगी झाली हो या मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. आता या मालिकेत शौनकचे लग्न होणार आहे. त्याच्या आईने साजिरीच्या वडिलांना तसे निमंत्रण देखील दिले आहे. गोजिरी ही आपलीच मुलगी आहे ही बाब शौनकला समजली आहे. त्यामुळे हे लग्न होणार की नाही असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. आता नवीन मालिकेच्या आगमनामुळे मुलगी झाली हो ही मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे. मालिकेचा शेवट सकारात्मक दाखवला जाणार असल्याने शौनक आणि साजिरी अखेर एकत्र येणार अशी आशा प्रेक्षकांना आहे. यात महत्वाचं म्हणजे कधीही न बोलणारी साजिरी आता मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात बोलताना दाखवणार आहे. त्यामुळे मालिकेच्या शेवटच्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.
टॅग्स :स्टार प्रवाहआई कुठे काय करते मालिका