Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सत्यवान सावित्री' मालिकेत सावित्रीच्या भूमिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 18:36 IST

Satyawan Savitri: झी मराठी वाहिनीवर ‘सत्यवान सावित्री’ ही मालिका ​येत्या १२ जूनपासून भेटीला येत आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘सत्यवान सावित्री’ ही मालिका ​येत्या १२ जून २०२२ पासून संध्याकाळी ७ वाजता भेटीला येत आहे.  या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यावेळी सावित्रीच्या बालपणीचा प्रवास या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बालपणीच्या सावित्रीच्या भूमिकेत राधा धारणे ही बालकलाकार पाहायला मिळणार आहे. पुढे ही मालिका लवकरच लीप घेणार असल्याचे दिसून येणार आहे त्यामुळे तरूणपणीच्या सावित्रीची भूमिका अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी निभावताना पाहायला मिळणार आहे. तर सत्यवानची भूमिका आदित्य दुर्वे साकारणार आहे. वेदांगी कुलकर्णी या मालिकेतून मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. 

साथ दे तू मला या मालिकेमुळे वेदांगीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. वेदांगी कुलकर्णी ही अभिनेत्री तसेच उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. अनेक मोठ्या मंचावर तिने आपल्या नृत्याची झलक दाखवून बक्षिसं मिळवली आहेत. वेदांगी मूळची मुंबईची डहाणूकर कॉलेज आणि डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले आहे. मुंबईत ती व्हिक्टोरियस डान्स अकॅडमी चालवत असून यामधून तिने अनेकांना नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे.

स्टार प्रवाह वरील साथ दे तू मला या मालिकेतून प्राजक्ताची मध्यवर्ती भूमिका तिने साकारली होती. याशिवाय झी युवा वरील सूर राहू दे ही मालिका, लंडनच्या आजीबाई, मऊ, छडा, लौट आओ गौरी, बिलिव्ह इन सारख्या नाटक तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठीच्या डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमात तिने सहभाग दर्शवला होता.

वेदांगी आणि अभिषेक तिळगुळकर यांनी २० नोव्हेंबर २०२१ रोजी राजेशाही थाटात लग्न केलं. अभिषेक हा पेट्रोलियम इंजिनिअर असून ऑस्ट्रेलियातुन त्याने एमबीएच शिक्षण घेतलं आहे. लग्नानंतर प्रथमच वेदांगी मध्यवर्ती भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सत्यवान सावित्री या मालिकेत तिला सावित्रीची भूमिका मिळाली आहे. तिच्यासोबत आदित्य दुर्वे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आदित्यची ही मुख्य भूमिका असलेली दुसरी मालिका आहे.